GRAMIN SEARCH BANNER

प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या कर्तव्यपथावर ‘वंदे मातरम् ‘ साठी चिपळूणच्या विद्यार्थ्यांची निवड

Gramin Varta
258 Views

चिपळूण : दिल्लीतील कर्तव्यपथावर (राजपथ) होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या दिमाखदार सोहळ्यात यंदा चिपळूणच्या कलेचा आणि कर्तृत्वाचा मान उंचावणार आहे. ‘वंदे मातरम्’ या विशेष सादरीकरणासाठी राज्यातून झालेल्या निवड चाचणीतून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघात चिपळूण तालुक्यातील मांडकी–पालवण येथील कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. दिनार संजय नेरुरकर आणि सुजल शीतल वाडकर हे दोघेही विद्यार्थी या राष्ट्रीय पातळीवरील सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

दिनार नेरुरकर हा महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असून सुजल वाडकर हा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे. या दोघांना प्रजासत्ताक दिनी देशभरातील मान्यवरांसमोर आपले सादरीकरण करण्याची संधी मिळणार असून त्यामुळे चिपळूणच्या शैक्षणिक व सांस्कृतिक परंपरेचा गौरव होणार आहे.

गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही चिपळूणचे सागर अंकुश पुंभार हे महाराष्ट्र संघाचे ‘टीम मॅनेजर’ म्हणून दिल्ली येथे जबाबदारी सांभाळणार आहेत. या उल्लेखनीय यशाबद्दल उद्योगमंत्री उदय सामंत तसेच आमदार शेखर निकम यांनी विद्यार्थ्यांचे दूरध्वनीवरून अभिनंदन केले आहे.

या विद्यार्थ्यांना संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, प्राचार्य डॉ. संकेत कदम आणि प्राचार्या डॉ. शमिका चोरगे यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. या यशामुळे चिपळूणच्या शैक्षणिक क्षेत्राचा नावलौकिक राष्ट्रीय स्तरावर वाढला असून परिसरातून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Total Visitor Counter

3200152
Share This Article