GRAMIN SEARCH BANNER

दापोलीत बॉक्साईट वाहतुकीमुळे शाळकरी मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली दखल

Gramin Varta
133 Views

दापोली : तालुक्यातील मांदिवली गावात ऊर्दू शाळेजवळून सुरू असलेल्या बॉक्साईट वाहतुकीमुळे शाळकरी मुलांच्या आरोग्य व शिक्षणावर गंभीर परिणाम होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची थेट नवी दिल्ली येथील राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दखल घेत रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने चौकशीसाठी विशेष समिती गठीत केली आहे.

मांदिवली येथील ऊर्दू शाळेजवळून मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या बॉक्साईट वाहतुकीमुळे धूळ, प्रदूषण आणि अपघाताचा धोका वाढल्याच्या तक्रारी पालक व ग्रामस्थांनी केल्या होत्या. यामुळे विद्यार्थ्यांना श्वसनविकारांचा त्रास होत असून शाळेचे शैक्षणिक वातावरणही बिघडत असल्याचे निदर्शनास आले आहे.

या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर दापोलीचे उपविभागीय अधिकारी डॉ. विजयकुमार सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत जिल्हा खनिकर्म अधिकारी, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी आणि दापोलीचे तालुका आरोग्य अधिकारी सदस्य म्हणून काम पाहणार आहेत, तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे चिपळूण येथील उपप्रादेशिक अधिकारी सदस्य सचिव असणार आहेत.

ही समिती शुक्रवार, ता. २३ रोजी दुपारी १२ वाजता मांदिवली येथे प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून चौकशी करणार असून, त्यानंतरचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार आहे. या चौकशीकडे पालक, ग्रामस्थ आणि शाळा प्रशासनाचे लक्ष लागून राहिले आहे.

Total Visitor Counter

3379714
Share This Article