सिंधुदुर्ग: दहावीच्या परीक्षेचा शेवटचा पेपर म्हणजे कोणत्याही विद्यार्थ्यासाठी आनंदाचा क्षण, कणकवली तालुक्यातील शिवडाव माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी सई संतोष सावंत हिच्यासाठी मात्र हा दिवस आयुष्यातील सर्वात भीषण आघात घेऊन आला. ज्या माऊलीने आपल्या लेकीने शिकावे आणि मोठे व्हावे असे स्वप्न पाहिले, त्याच आईचे छत्र परीक्षेच्या आदल्या दिवशी अचानक हरपले. १७ मार्च रोजी सईच्या आईला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. घरात आईचा मृतदेह समोर असताना आणि काळजात दुःखाचा डोंगर साचलेला असताना, सईने अश्रूंना वाट करून देत १८ मार्च रोजी आपला दहावीचा शेवटचा पेपर देण्याचा जो विलक्षण निर्धार दाखवला.
हसत्या-खेळत्या घरातील आईचा आधार कायमचा गेल्याने सई पूर्णपणे खचून जाणे स्वाभाविक होते, मात्र आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने या अत्यंत कठीण प्रसंगातही स्वतःला सावरले. १८ मार्चच्या सकाळी घरात आईच्या अंत्यविधीची तयारी सुरू असताना सईने हातात पेन आणि हॉलतिकीट घेतले आणि ती जड अंतःकरणाने परीक्षा केंद्रावर पोहोचली. परीक्षा हॉलमध्ये पेपर लिहित असताना सईच्या डोळ्यांतून सतत अश्रू वाहत होते आणि आईच्या आठवणीने वारंवार हुंदका दाटून येत होता, तरीही तिचे हात थांबले नाहीत. मनावर दगड ठेवून तिने शांतपणे आपला शेवटचा पेपर पूर्ण केला. तिला या कठीण काळात शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी मोठे पाठबळ दिले. पेपर संपवून जेव्हा ती केंद्राबाहेर पडली, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे ओलावले होते. परीक्षेचा कर्तव्य पार पाडल्यानंतर सई थेट आईच्या अंत्यसंस्कारासाठी घराकडे रवाना झाली. नियतीने क्रूर घाला घातला असला, तरी सईने दाखवलेल्या या अफाट धैर्याने आज माणुसकी आणि जिद्दीचे एक नवीन उदाहरण समाजासमोर उभे केले आहे.







