GRAMIN SEARCH BANNER

१२ गुन्हे, २४ अधिकारी, ३० साक्षीदार अन् ४६५० व्हिडीओ लिंक डिलीट; भोंदू खरात प्रकरणी तेजस्वी सातपुतेंची मोठी माहिती

Gramin Varta
210 Views

नाशिक:  भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. या भोंदू अशोक खरातला बलात्काराच्या आरोपाखाली अटक झालेली असून तो सध्या कोठडीत आहे.

भोंदू खरातची एसआयटीद्वारे चौकशी केली जात असून दररोज या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत आहे. याच अशोक खरात प्रकरणी आतापर्यंत तपासात काय-काय माहिती समोर आली? याबाबतची सविस्तर माहिती आज एसआयटीच्या प्रमुख आयपीएस तेजस्वी सातपुते यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.

तेजस्विनी सातपुते काय म्हणाल्या?

“अशोक खरात प्रकरणाबाबतचे एकूण ११ गुन्हे एसआयटीकडे तपासासाठी आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीकडे दोन पोलीस उपअधीक्षक, तीन सहाय्यक पोलीस उप-निरीक्षक आणि पोलीस कर्मचारी असे मिळून २४ जणांचं एसआयटीचं पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. अशोक खरातवर नाशिक आणि अहिल्यानगर जिल्हा असे एकूण १२ गुन्हे दाखल आहेत. या १२ गुन्ह्यांपैकी ९ गुन्ह्यांचा तपास एसआयटी करत आहे, तर २ गुन्ह्यांचा तपास अहिल्यानगर पोलीस करत आहेत. तसेच एका गुन्ह्याचा तपास नाशिक शहर पोलीस करत आहेत”, अशी माहिती तेजस्विनी सातपुते यांनी दिली आहे.

“तसेच अशोक खरात विरुद्ध नसलेले मात्र या प्रकरणाशी संबंधित असलेले असे दोन गुन्हे दाखल आहेत. त्या दोन गुन्ह्यांचा तपास देखील एसआयटी करत आहे. त्यामुळे ९ गुन्हे अशोक खरातच्या विरोधातील आणि अशोक खराच्या विरोधात नसलेले पण याच प्रकरणाशी संबंधित असलेले दोन गुन्हे अशा एकूण ११ गुन्ह्यांचा तपास एसआयटी करत आहे. यातील एसआयटीकडे तपासासाठी आलेले ८ गुन्हे हे महिला लैंगिक अत्याचाराबाबतचे आहेत. तसेच उर्वरित ३ गुन्हे हे फसवणूक आणि अंधश्रद्धा विरोधी कायदा याबाबतचे आहेत”, अशी माहिती तेजस्विनी सातपुते यांनी दिली.

आतापर्यंत एसआयटीने काय तपास केला?

“आतापर्यंत एसआयटीने केलेल्या तपासादरम्यान ३० पेक्षा जास्त साक्षीदारांकडे विचारपूस केली. साक्षीदारांकडे आणि पीडित महिलांकडे जी चौकशी केली त्यानुसार आरोपी हा पीडित महिलांचा गैरफायदा घेत होता. आरोपी हा त्यांना भिती दाखवत होता. खडे, रुद्राक्ष, चिंचुके, विधी अशा विविध माध्यमांतून आरोपी हा पैसे उकळण्याचं काम करत होता. तसेच आरोपी हा दैवी शक्तीची भिती दाखवत असायचा. पीडितांच्या कुटुंबियांच्या मृत्यूची भीती दाखवून बदनामी करण्याची धमकी देऊन लैंगिक शोषण करत होता”, अशी माहिती समोर आली असल्याचं तेजस्विनी सातपुते यांनी सांगितलं आहे.

आक्षेपार्ह व्हिडीओच्या ४६५० लिंक डिलीट केल्या

तेजस्वी सातपुते यांनी पुढे म्हटलं की, “या घटनेतील पीडितांचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाले होते, त्या व्हिडीओच्या एकूण ४६५० लिंक सायबर टीमने डिलीट केल्या आहेत. यासाठी ४ जणांची टीम काम करत असून आणखी लक्ष ठेऊन आहे. तसेच या घटनेबाबत सोशल मीडियावर पुन्हा-पुन्हा शेअर करणाऱ्या ४५१ अकाउंट कायमस्वरुपी बंद करण्यात आलेले आहेत. तसेच पीडितांचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी आतापर्यंत दोन गुन्हे दाखल झालेले आहेत”, अशी माहिती तेजस्विनी सातपुते यांनी सांगितली आहे.

अशोक खरात प्रकरणात ED ची एन्ट्री

“अशोक खरातचे आर्थिक व्यवहार, त्याची संपत्ती याबाबात देखील अनेकांच्या मनात प्रश्न आहेत. मात्र, याबाबत ईडीने दखल घेतली असून ईडीने एसआयटीकडून जी माहिती मागितली होती ती सर्व माहिती एसआयटीने ईडीला दिलेली आहे”, असंही तेजस्विनी सातपुते यांनी स्पष्ट केलं आहे.

Total Visitor Counter

3284969
Share This Article