रत्नागिरी: कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्रात CODE (दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्र) येथे कार्यरत असणारे स्वरूप काणे यांना राज्यस्तरावरील निबंध स्पर्धेत यश मिळाले आहे.
पदवीधर प्रकोष्ठ शिक्षक आघाडी आणि नवीन पनवेल येथील आदर्श शैक्षणिक समूह यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त राज्यस्तरावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे बक्षीस वितरण नवीन पनवेल येथील धनराजजी विसपुते सभागृहात पार पडले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या संपूर्ण कारकिर्दीवर आधारित ही स्पर्धा होती. या स्पर्धेत स्वरूप काणे यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे मंदिर बांधकाम आणि धार्मिक कार्य या विषयावर निबंध लिहिला होता. राज्यभरातील ११ हजार १३९ राज्यभरातून निबंध पाठवले होते. स्पर्धेसाठी ४० तज्ज्ञ परीक्षकांची टीम होती. एकूण २० विजेत्यांमध्ये स्वरूप काणे यांचा समावेश आहे.
बक्षीस वितरण समारंभाला विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, आदर्श शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष व भाजप पदवीधर प्रकोष्ठ प्रदेश संयोजक धनराज विसपुते आदी मान्यवर उपस्थित होते.श्री. काणे यांच्या यशाबद्दल रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक प्रा. दिनकर मराठे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
रत्नागिरी : स्वरूप काणे यांचे राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत यश
