रत्नागिरी: रत्नागिरी तालुक्यातील वाटद औद्योगिक क्षेत्रात १० हजार कोटी रुपयांच्या प्रचंड गुंतवणुकीसह प्रस्तावित असलेला ‘धिरुभाई अंबानी डिफेन्स सिटी’ प्रकल्प सध्या चर्चेत आला आहे. रिलायन्स ग्रुप आणि एका जर्मन कंपनीच्या संयुक्त भागीदारीतून हा भव्य प्रकल्प साकारणार असला तरी, त्याच्या सुरक्षेवरून गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर, माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी थेट संरक्षण मंत्रालयाला पत्र लिहून रत्नागिरीत नौदल तळाच्या तातडीच्या गरजेवर भर दिला आहे.
प्रस्तावित ‘डिफेन्स सिटी’ प्रकल्पामध्ये दरवर्षी २ लाख आर्टिलरी शेल्स, १० हजार टन स्फोटके, २ हजार टन प्रोपेलंट्स, तोफांसाठी दारुगोळा, लष्करी सामुग्री आणि विविध यंत्रणा तयार केल्या जाणार आहेत. हे प्रचंड उत्पादन पाहता या प्रकल्पाचे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्व मोठे आहे. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणावर स्फोटके आणि लष्करी सामुग्रीचे उत्पादन व साठा होणार असल्याने त्याच्या सुरक्षेसाठी रत्नागिरीत नौदल तळ नसल्याची गंभीर बाब कीर यांनी आपल्या पत्रात नमूद केली आहे.
रत्नागिरी हे कोकण किनारपट्टीवरील एक महत्त्वाचे शहर असून, भौगोलिकदृष्ट्या ते खुल्या आक्रमणाच्या दृष्टीने संवेदनशील मानले जाते. सद्यस्थितीत येथे केवळ एक कोस्ट गार्ड स्टेशन कार्यरत आहे, परंतु त्याचे कार्य शोध, बचाव आणि निरीक्षणापुरतेच मर्यादित आहे. युद्धजन्य परिस्थितीत तातडीने प्रत्युत्तर देऊ शकणारा किंवा प्रभावी कारवाई करू शकणारा नौदल तळ रत्नागिरीत अजूनही अस्तित्वात नाही, याकडे कीर यांनी लक्ष वेधले आहे.
सन २०२० मध्ये लेबनॉनमधील बेरूत बंदरावर २,७५० टन अमोनियम नायट्रेटचा साठा होता. याच्या स्फोटामुळे शेकडो लोकांचा मृत्यू झाला, हजारो जखमी झाले आणि संपूर्ण शहर हादरले होते. या दुर्घटनेचा दाखला देत मिलिंद कीर यांनी स्फोटक व्यवसायातून होणारा संभाव्य विनाश किती भयावह असू शकतो, हे स्पष्ट केले आहे. स्थानिक सत्ताधाऱ्यांनी अशा दुर्घटनांपासून धडा घेण्याची आणि भविष्यात कोणतीही हानी टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कीर यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे की, हा प्रकल्प केवळ आर्थिक नव्हे, तर तो थेट राष्ट्रीय सुरक्षेशी जोडलेला आहे. यामुळे शासनाने अत्यंत काळजीपूर्वक आणि दूरदृष्टीने निर्णय घेणे आवश्यक आहे. जर हा ‘डिफेन्स सिटी’ प्रकल्प रत्नागिरीतच राहणार असेल, तर त्याच्या सुरक्षेसाठी तातडीने नौदल तळ उभारण्यात यावा, अशी आग्रही मागणी माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी संरक्षण मंत्रालयाकडे केली आहे. या महत्त्वपूर्ण मागणीवर सरकार काय भूमिका घेते आणि रत्नागिरीच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना केल्या जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.