GRAMIN SEARCH BANNER

फ्लॅट सील करण्यासाठी आलेल्या बँक कर्मचाऱ्याला कर्जदार महिलेची आत्महत्येची धमकी, भीतीने पथक फिरले माघारी

Gramin Varta
380 Views

रत्नागिरी : कर्ज थकबाकीमुळे बँकांकडून वसुलीचा तगादा वाढत असताना शहरात एक तणावपूर्ण घटना घडली. कोविड काळात कर्ज घेतलेल्या एका महिलेचा फ्लॅट सील करण्यासाठी बँक अधिकारी पोलिस बंदोबस्तासह दाखल झाले असता, संबंधित महिलेने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे परिस्थिती गंभीर बनली आणि अखेर बँक अधिकारी व पोलिसांना माघार घ्यावी लागली.

माहितीनुसार, संबंधित महिलेने कोरोना काळात सुमारे १९ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. यापैकी ५ लाख रुपयांची परतफेड केल्याचा तिचा दावा आहे. मात्र कोविड काळात व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाल्याने नियमित हप्ते भरणे शक्य न झाल्याने कर्ज थकीत झाले. त्यानंतर बँकेकडून सातत्याने वसुलीचा तगादा सुरू होता.

हा वाद पुढे न्यायालयात गेला. न्यायालयाच्या आदेशानंतर शुक्रवारी (ता. २) सकाळी खासगी बँकेचे अधिकारी पोलिसांसह संबंधित महिलेच्या फ्लॅटवर पोहोचले. सकाळी अकरा वाजल्यापासून तेथे बँक अधिकारी व पोलिसांचा तळ होता. दिवसभर दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद सुरू होता.

सायंकाळच्या सुमारास बँक अधिकाऱ्यांनी फ्लॅटला कुलूप लावले. यामुळे संतप्त झालेल्या महिलेने बाहेरून पेट्रोल आणून, ‘माझ्या घराला टाळे लावण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?’ असा सवाल करत अंगावर पेट्रोल ओतले आणि आत्महत्येची धमकी दिली. प्रसंग गंभीर होताच बँक अधिकारी व पोलिसांनी तातडीने लावलेले कुलूप काढले आणि घटनास्थळ सोडले. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Total Visitor Counter

3366874
Share This Article