पोलादपूर: मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, चांढवे टोल नाक्यावरील दुर्घटना ताजी असतानाच शनिवारी दुपारी आणखी एका भीषण अपघाताने महामार्ग रक्ताळला आहे. पोलादपूर हद्दीतील हॉटेल बालाजीजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कंटेनरला मागून येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अपघातात कारमधील दापोलीकडे जाणाऱ्या एकाच कुटुंबातील आई आणि मुलीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल रावसाहेब मार्केड हे आपल्या परिवारासह कार (क्रमांक एमएच ०८ एएन २४३९) घेऊन मुंबई-गोवा महामार्गावरून महाड बाजूकडून दापोलीच्या दिशेने जात होते. त्यांची कार पोलादपूरनजीक हॉटेल बालाजीजवळ आली असता, रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर (क्रमांक एमएच ०४ एलवाय १६३८) मागून प्रचंड वेगात आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, धडकेमुळे कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या दुर्घटनेत सुवर्णा मार्केड आणि अनुक्षी अनिल मार्केड यांचा जागीच मृत्यू झाला. तर अनिल मार्केड आणि चिन्मय मार्केड हे दोघे गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
कार कंटेनरखाली एवढी अडकली होती की, अखेर जेसीबीच्या सहाय्याने कारला बाहेर काढावे लागले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने चेंदामेंदा झालेल्या कारमधून जखमींना आणि मृतदेह बाहेर काढले. जखमींना तातडीने पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर, गंभीर जखमी असलेले वडील अनिल मार्केड यांना पुढील उपचारासाठी माणगाव येथे हलवण्यात आले आहे, तर चिन्मय याला महाड येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या घटनेमुळे दापोली परिसरासह संपूर्ण महामार्गावर हळहळ व्यक्त होत असून पोलादपूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.





