पाली: पाली ते करंजारी दरम्यानच्या ११ केव्ही करंजारी फिडरवर रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील कशेळी पुलाजवळ सायंकाळच्या सुमारास जोरदार पावसात एक मोठे जांभळीचे झाड कोसळल्याने विद्युत वाहिनी तुटली आहे. यामुळे करंजारी फिडरवरील तब्बल नऊ गावांचा वीजपुरवठा खंडित झाला असून, नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कशेळी, नाणीज, चोरवणे, करंजारी, घाटीवळे, जंगलवाडी, देवळे, मेघी आणि चाफवली या गावांचा विद्युत पुरवठा ठप्प झाला आहे. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे झाड कोसळल्याने ही घटना घडली.
महावितरणच्या वतीने कळविण्यात आले आहे की, तुटलेली वीजवाहिनी दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले जाईल, मात्र दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत या गावांचा वीजपुरवठा बंद राहील. महावितरणने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. झाड कोसळल्यामुळे परिसरातील वाहतुकीवरही परिणाम झाला होता, मात्र आता ती पूर्ववत सुरू झाली आहे.