संगमेश्वर: संगमेश्वर-देवरुख मुख्य रस्त्यावरील बुरंबी ते लोवले दरम्यानचा रस्ता सध्या वाहनचालकांसाठी एक मोठा धोका बनला आहे. रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे, अशी माहिती संगमेश्वर प्रतिनिधीने दिली आहे.
विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा रस्ता अधिकच धोकादायक ठरत आहे. काही ठिकाणी खड्ड्यांमध्ये चाक अडकून पडण्याची भीती निर्माण झाली आहे, तर खड्डे चुकवताना वाहनांचे संतुलन बिघडल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या साईडपट्ट्यांची अवस्थाही अत्यंत वाईट असल्याने प्रवासातील धोका आणखी वाढला आहे.
या रस्त्यावर काही काळापूर्वी केबल खोदाईचे काम करण्यात आले होते. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याची योग्यरीत्या डागडुजी न केल्याने आज ही भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्यामुळे हे खड्डे आणखी खोल झाले असून, पाण्याने भरल्याने त्यांची नेमकी खोली कळत नाही, त्यामुळे अपघाताचा धोका अधिकच वाढला आहे.
स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी केली आहे. या रस्त्याचे डागडुजीचे काम तातडीने हाती घेण्यात यावे, अन्यथा मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे. प्रशासनाने यावर लवकरात लवकर उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.