मुंबई : विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर रायगडच्या पालकमंत्रीपदी आदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, या नियुक्तीवर शिवसेना शिंदे गटाकडून आक्षेप घेण्यात आला होता.
त्यामुळे 24 तासांत रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीला स्थगिती द्यावी लागली होती. मात्र त्यानंतर अद्यापही या ठिकाणी पालकमंत्री पदाची नियुक्ती झालेली नाही. अशातच गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटाचे रायगडचे आमदार भरत गोगावले यांच्यावर अघोरी पूजेचा आरोप होताना दिसत आहे. याचपार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी रायगड पालकमंत्रिपदाचा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित करत नाव न घेता भरत गोगावले यांच्यावर निशाणा साधला.
विधेयकावर बोलताना अनिल परब म्हणाले की, निवडून येणाऱ्या माणसाचे अधिकार काय? आणि त्याला किती संरक्षण मिळायला पाहिजे? कारण तो शेवटी जनतेतून येतो. त्यामुळे निवडून येणाऱ्या व्यक्तीला एक वर्ष तरी संरक्षण मिळालं पाहिजे. कारण सहा महिन्यात त्याला लगेच साधे बहुमत म्हणून काढून टाकलं जातं. अशा असुरक्षित भावनेने सदर नगराध्यक्ष कसा काम करू शकतो? त्यामुळे सरकार सुरक्षा पुरवण्याचं जे काम करत आहे, हे खरंच प्रशंसनीय आहे.
आपण गेल्या महिन्यांमध्ये वेगवेगळे कायदे करून वेगवेगळ्या पद्धतीने सुरक्षा दिली आहे. आपण लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊन मजबूत स्थान दिलं, शेतकऱ्यांना न्याय दिला, पण आज माझा विषय आहे की, तुम्ही एवढ्या लाडक्या बहिणींचा मान सन्मान करत आहेत. त्यामुळे माझं देखील एक कर्तव्य आहे की, महाराष्ट्राच्या प्रत्येक बहिणीची सुरक्षा राहण्यासाठी माझं योगदान काय? मी माझ्या बहिणीची सुरक्षा राखण्यासाठी काय करू शकतो? असे प्रश्न माझ्यासमोर आहेत म्हणत अनिल परब यांनी अदिती तटकरे यांचा उल्लेख केला.
अनिल परब म्हणाले की, सभागृहात आदिती तटकरे इथे बसल्या आहेत. तसेच पंकजा मुंडे माझ्या बहीण आहेत. तसेच माधुरी मिसाळ बसल्या आहेत. तुमच्या सगळ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आहे. कारण आपण सर्वोच्च स्थानी बसला आहात. तुम्ही जशी नगराध्यक्षांची सुरक्षा बघताय, त्याप्रमाणे विधेयकात काळजी घेण्यात आली आहे. पण पालकमंत्र्यासोबत काही होणार असेल तर त्याची काळजी कोण घेणार? या तांत्रिक मांत्रिक युगामध्ये जे काही रायगड जिल्ह्यात तंत्र, मंत्र, अघोरी प्रकार जो चालला आहे, माझ्या बहिणीच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. कारण मला भीती वाटते की, जाता-येता अपघात होऊ नये, कुठला मंत्र त्यांच्यावर येऊ नये. अघोरी प्रकार होऊ नये यासाठी भावाचा आशीर्वाद म्हणून मी बाकीचं काही करु शकत नाही. मी अंधश्रद्धा मानत नाही. पण हे सुरक्षा कवच माझ्या बहिणीला असावं, असे म्हणत अनिल परब यांनी सभागृहात लिंबू-मिरची दाखवली.
अनिल परब म्हणाले की, रायगड जिल्ह्यातला जो काही प्रकार सोशल मीडियावर बघतोय. अघोरी रेडे, बैल कापले गेले असतील, बळी गेले असतील, अशा बळींपासून सुरक्षा मिळावी म्हणून आपल्या मराठीत लिंबू-मिरची देतात. तसं ताई मी (आदिती तटकरे) तुमच्या सुरक्षेसाठी एवढंच देऊ शकतो. मला अंधश्रद्धेचा प्रचार करायचा नाही. पण मला जे वाटतं, कदाचित मी चुकीचाही असेल. पण माझ्या संस्कृतीत बहिणीसाठी भावाने काहीतरी केलं पाहिजे. कारण ज्याच्या मनात बहिणीविषयी काही बरं-वाईट असेल, केवळ पालकमंत्री पदासाठी असेल, तर या सभागृहाचा सदस्य आणि भाऊ म्हणून माझ्या बहिणीची इळा-पिळा टळावी यासाठी मी लिंबू-मिरची आणले आहेत. त्यांच्यापर्यंत हे लिंबू-मिरची पोहोचवावेत, अशी विनंती अनिल परब यांनी केल्यानंतर सभागृहात हशा पिकला.
अनिल परब परिषदेत लिंबू-मिरची घेऊन आले; म्हणाले, माझ्या बहिणीच्या सुरक्षेचा प्रश्न

Leave a Comment