GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीत ईगल इन्फ्रा कंपनीच्या स्टोअर्समध्ये डिझेल चोरीचा प्रयत्न; कंपनीच्याच तीन कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी: रत्नागिरी तालुक्यातील पाली येथील ईगल इन्फ्रा कंपनीच्या प्लांटवर ५० लिटर डिझेल चोरी करण्याचा प्रयत्न उघडकीस आला असून, याप्रकरणी कंपनीतच कार्यरत असलेल्या तीन कर्मचाऱ्यांविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीचे प्लांट प्रभारी राजेशकुमार देवीदयाल यादव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी हर्षितकुमार श्रीराम पांड्ये, कमल दिलीप उपाध्याय आणि अब्दुल बुद्धू हुसेन रेहमान (सर्व राहणार पाली, रत्नागिरी) यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

​ही घटना १ मार्च २०२६ रोजी पहाटे ४:३० वाजण्याच्या सुमारास घडली. ईगल इन्फ्रा कंपनीच्या पाली येथील प्लांटवर असलेल्या स्टोअर्समधून ५० लिटर डिझेल फिर्यादी किंवा कंपनीच्या कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याची परवानगी न घेता, लबाडीच्या इराद्याने चोरून नेण्याचा प्रयत्न या तिन्ही आरोपींनी केला. स्टोअर्समध्ये कामाला असतानाच त्यांनी हा प्रकार केल्याचे समोर आले असून, चोरीचा हा प्रयत्न वेळीच लक्षात आल्याने कंपनीचे नुकसान टळले आहे.

​याप्रकरणी कंपनीचे प्रभारी राजेशकुमार यादव यांनी दुपारी १:३० वाजता रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०६, ६२ आणि ३(५) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२/२०२६ नुसार नोंद केला आहे. स्वतःच्याच कंपनीत विश्वासाने काम करत असताना कर्मचाऱ्यांनीच अशा प्रकारे डल्ला मारण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात चर्चेचा विषय बनला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3488047
Share This Article