खेड: तालुक्यातील भोस्ते येथे किरकोळ वादातून दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. गाडीने सायकलला कट मारल्याच्या संशयावरून सुरू झालेल्या वादातून हा प्रकार घडला असून, यात फिर्यादीसह त्यांच्या मदतीला आलेल्या कुटुंबातील सदस्यांना मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी ११ जणांविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना ३१ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास भोस्ते रेल्वे पुलाजवळच्या छोट्या सबवेच्या वळणावर घडली. या घटनेप्रकरणी संदेश संतोष पाटील (वय ३०, रा. भोस्ते, पाटीलवाडी) यांनी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी संदेश पाटील हे त्यांच्या बालेनो गाडीने मित्र हर्षद पाटील याला रुग्णालयात भेटण्यासाठी जात होते.
त्याचवेळी समोरून मोटारसायकलवरून येत असलेले सूरज पाटील आणि ओंकार पाटील यांनी त्यांची गाडी अडवली. ‘तू आमच्या मोटारसायकलला दाबण्याचा प्रयत्न का केलास?’ असे विचारून त्यांनी संदेश पाटील यांच्याशी बाचाबाची करण्यास सुरुवात केली. हा वाद वाढत गेल्याने त्यांनी इतर आरोपींना फोन करून बोलावून घेतले.
यावेळी रामदास पाटील, गुरुनाथ पाटील, संकेत पाटील, रवींद्र पाटील, सारिका पाटील, सूरज पाटील, ओंकार भार्गव पाटील, अनुज पाटील, सोहम पाटील, ओंकार गुरुनाथ पाटील आणि समीर मोरे यांच्यासह सुमारे ११ जणांच्या जमावाने संदेश पाटील यांच्यावर हल्ला केला. त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण करण्यात आली. तसेच, शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिली. यावेळी संदेश यांच्या मदतीसाठी आलेल्या त्यांच्या कुटुंबीयांनाही मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कायद्याच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.