लाखोंचे रोख व्यवहार, दीपावलीच्या तोंडावर चौकशी सुरू; मोठी फसवणूक होण्याची भीती
दापोली: दापोली शहरात ‘दापोली फंड’ या नावाने गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर आर्थिक व्यवहार सुरू असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. सार्वजनिक महामंडळातील काही कर्मचारी आणि महिला कर्मचारी यात थेट सहभागी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी दापोली येथील सुज्ञ नागरिकांनी पोलीस उप अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली असून, दिवाळीच्या अगदी आदल्या दिवशी दापोली पोलिसांनी काही कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
शहरातील काही कर्मचाऱ्यांनी ‘दापोली फंड’ या नावाने अनेक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून त्यातून आर्थिक देवाणघेवाण सुरू केली आहे. प्रत्येक ग्रुपमध्ये ५० ते ६० सभासद असून, प्रत्येक जण दर महिन्याला ₹1000 ते ₹5000 रुपये रोख रक्कम स्वापात जमा करतो. ही जमा झालेली रक्कम काही कोटींच्या घरात असल्याची चर्चा आहे. या पैशांचे व्यवहार गूगल पे, फोन पे किंवा बँक ट्रान्स्फरद्वारे न होता, सर्व व्यवहार फक्त रोख स्वापात केले जातात. या फंडाची रचना अशी आहे की, वर्षभर पैसे गोळा केल्यानंतर दिवाळीच्या आठवडाभर आधी फंड फोडला जातो आणि ज्यांनी गुंतवणूक केली आहे त्यांना मूळ रकमेवर काही हप्ते व ‘गिफ्ट’ देऊन पैसे परत केले जातात. याचीच प्रचिती दीपावलीच्या आदल्या दिवशी वाटण्यात आलेली रोख रकमेचे पाकीट व भेटवस्तू यातून आली.
या अवैध फंडाचा मुख्य सूत्रधार म्हणून शहरातील एका कर्मचाऱ्याचे नाव तक्रारीत नमूद आहे. तो अनेक वर्षांपासून दापोलीतच लोकल ड्युटी करून उर्वरित वेळेत व्याजाचे हप्ते आणि रोख वसुलीचे काम करत असल्याचा आरोप आहे. या फंडातून दर महिन्याला लाखों रुपयांची उलाढाल होत असल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या व्याजाच्या उत्पन्नातून या कर्मचाऱ्याने आपल्या नातेवाईकांच्या नावावर फ्लॅट व अन्य मालमत्ता विकत घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या फंडाच्या कारभाराला दापोलीतील काही अधिकाऱ्यांचा पाठिंबा असल्याची माहिती तक्रारीत नमूद आहे. याच विषयावर वरिष्ठ अधिकारी यांनी एकदा अंतर्गत तक्रार केली होती, परंतु ती परस्पर हाताळण्यात आल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये आहे. त्यानंतर सर्व व्यवहार फक्त रोख स्वापातच ठेवले गेले. या फंडामुळे शहरात अनेकदा वादावादी आणि हाणामारीच्या घटनाही घडल्या आहेत. कार्यालय परिसरात अनेकदा या फंडाच्या पैशांवर मोठ्या आवाजात वाद झाले आणि काही वेळा पोलिसांपर्यंत प्रकरण पोहोचले असल्याचेही सांगितले जाते. या कर्मचाऱ्यांनी दापोलीतच स्थायिक राहून, तालुक्याबाहेरील ड्युटी टाळून या बेकायदेशीर व्यवहाराला चालना दिल्याचे दिसून येत आहे. तक्रारदार यांनी आपल्या निवेदनात, अशाच प्रकारचा ‘टीडब्ल्यूजे’ घोटाळा चिपळूण शहरात गाजला होता, त्याच पद्धतीने हा ‘दापोली फंड’ प्रकार चालू आहे. यात सामान्य नागरिकांसह महामंडळ कर्मचाऱ्यांचाही पैसा गुंतवला जात आहे. भविष्यात हा प्रकार मोठ्या आर्थिक फसवणुकीत परिवर्तीत होण्याची शक्यता आहे, अशी भीती व्यक्त केली आहे. काही महिला कर्मचाऱ्यांचीही चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.