GRAMIN SEARCH BANNER

मुंबई-गोवा महामार्गावर गेले पाच दिवस बावनदी पुलाजवळ बंद ट्रकचा अडथळा; भीषण अपघाताची भीती

रत्नागिरी: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास दिवसेंदिवस धोकादायक होत चालला असून, आता बावनदी पुलाजवळील एका वळणावर गेल्या पाच दिवसांपासून बंद अवस्थेत उभ्या असलेल्या ट्रकमुळे वाहनधारकांच्या जिवावर टांगती तलवार निर्माण झाली आहे. अत्यंत अवघड वळण आणि त्यातच भररस्त्यात असलेला हा अडथळा यामुळे या ठिकाणी कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, या गंभीर प्रकाराकडे महामार्ग पोलीस आणि संबंधित प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

बावनदी पुलाजवळील हे वळण तांत्रिकदृष्ट्या अत्यंत क्लिष्ट असून यापूर्वीही येथे अनेक अपघात झाले आहेत. अशा संवेदनशील ठिकाणी पाच दिवसांपूर्वी एक ट्रक तांत्रिक बिघाडामुळे बंद पडला, जो अद्यापही त्याच स्थितीत उभा आहे. या मार्गावरून धावणाऱ्या वाहनांची गती अधिक असते, त्यातच समोरून येणाऱ्या वाहनांना या ट्रकचा अंदाज येत नाही. विशेषतः रात्रीच्या वेळी आणि पहाटे पडणाऱ्या धुक्यामुळे हा ट्रक वाहनचालकांना दिसत नसल्याने भीषण अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. पाच दिवस उलटूनही हा ट्रक बाजूला करण्यासाठी प्रशासनाकडून साधी हालचालही झाली नसल्याने स्थानिक नागरिकांनी आणि नियमित प्रवास करणाऱ्या चालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

या मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी असलेल्या महामार्ग पोलिसांना हा अडथळा का दिसत नाही, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. एखादा मोठा अनर्थ घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, अशी विचारणा संतप्त वाहनचालक करत आहेत. या ठिकाणी तातडीने क्रेन पाचारण करून हा ट्रक महामार्गावरून बाजूला करावा आणि प्रवाशांचा प्रवास सुरक्षित करावा, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा, एखाद्या निष्पाप प्रवाशाला प्रशासकीय दिरंगाईमुळे आपला जीव गमवावा लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

Total Visitor Counter

3480129
Share This Article