GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचा ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मिशन प्रतिसाद’ उपक्रम; तक्रारींचे १०० टक्के निवारण

Gramin Varta
210 Views

रत्नागिरी:  जिल्हा पोलीस दलाने जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या तक्रार निवारणासाठी ‘मिशन प्रतिसाद’ हा विशेष लोकाभिमुख उपक्रम हाती घेतला असून, या माध्यमातून आतापर्यंत प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींचे यशस्वीरीत्या निवारण करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली १० सप्टेंबर २०२५ पासून हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.विशेषतः एकटे राहणारे, दुर्गम भागात वास्तव्यास असलेले आणि मदतीची गरज असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना तात्काळ पोलीस मदत उपलब्ध करून देणे, हा या मिशनचा मुख्य उद्देश आहे.या उपक्रमांतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी ९६८४७०८३१६ आणि ८३९०९२९१०० हे दोन स्वतंत्र हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले असून, डायल ११२ वरूनही ज्येष्ठ नागरिक आपली तक्रार नोंदवू शकतात.

या मिशनच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात एक स्वतंत्र आणि समर्पित कक्ष स्थापन करण्यात आला असून, त्यामध्ये चार पोलीस अंमलदारांची नेमणूक करण्यात आली आहे. हेल्पलाईनवर तक्रार प्राप्त होताच संबंधित माहिती त्वरित त्या हद्दीतील पोलीस ठाण्याला कळवली जाते. त्यानंतर पोलीस अधिकारी आणि अंमलदार प्रत्यक्ष ज्येष्ठ नागरिकांच्या घरी भेट देऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण करतात. केवळ समस्या सोडवून पोलीस थांबत नाहीत, तर तक्रारीचे निवारण झाल्यानंतर बीट अंमलदार आणि मिशन प्रतिसाद कक्षाकडून संबंधित ज्येष्ठ नागरिकाचे समाधान झाले आहे की नाही, याची खात्री करूनच ती तक्रार बंद केली जाते.पोलीस अधीक्षक स्वतः या प्रक्रियेवर लक्ष ठेवून असून, अनेकदा ते स्वतः ज्येष्ठ नागरिकांशी फोनवरून संवाद साधून त्यांना मिळालेल्या मदतीची शहानिशा करतात.

आजवर या उपक्रमांतर्गत एकूण २०३ ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या विविध समस्या मांडल्या आहेत. यामध्ये मुलांकडून होणारी मारहाण, शिवीगाळ, आर्थिक फसवणूक, घरगुती वाद, शिधा न मिळणे, कर्कश ध्वनी प्रदूषण आणि आजारपणात लागणारी मदत अशा स्वरूपाच्या तक्रारींचा समावेश होता, ज्यांचे १०० टक्के निवारण करण्यात पोलिसांना यश आले आहे. रत्नागिरी जिल्ह्याची भौगोलिक रचना पाहता अनेक दुर्गम खेड्यांपर्यंत पोलीस या उपक्रमाच्या माध्यमातून पोहोचत असल्याने ज्येष्ठ नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी आणि पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांनी जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना या हेल्पलाइन क्रमांकांचा निर्भयपणे वापर करण्याचे आवाहन केले आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या प्रभावीपणे मार्गी लावण्यासाठी रत्नागिरी पोलीस दल पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Total Visitor Counter

3200895
Share This Article