नळ कनेक्शनची रक्कम सात वर्षांनंतरही न मिळाल्याने संताप
देवरुख : शहरातील नगरपंचायत कार्यालयाच्या पाणीपुरवठा विभागातील एका कर्मचाऱ्याने नळ कनेक्शनसाठी भरलेली रक्कम सात वर्षांचा कालावधी उलटूनही परत न दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित नागरिक अमित जाधव यांनी नगराध्यक्षा मृणाल शेट्ये यांच्याकडे तक्रार अर्ज सादर केला आहे.
अमित जाधव यांची देवरुख एस. टी. स्थानकात कॅन्टीन होती. सन २०१८ मध्ये दोन नळ कनेक्शनसाठी त्यांनी नगरपंचायत कर्मचाऱ्याकडे १० हजार रुपये जमा केले होते. त्यापैकी ५ हजार रुपयांची पावती त्यांना देण्यात आली होती. मात्र, कॅन्टीनचा परवाना रद्द झाल्याने नळ कनेक्शन घेण्यात आले नाही. त्यानंतर भरलेली रक्कम परत मिळावी यासाठी जाधव गेली सात वर्षे संबंधित कर्मचाऱ्याकडे पाठपुरावा करत आहेत.
या संदर्भात त्यांनी तत्कालीन मुख्याधिकारी यांच्याकडेही आपली व्यथा मांडली होती. मात्र अद्यापही रक्कम परत न मिळाल्याने संबंधित कर्मचाऱ्याने आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे.
दरम्यान, नगराध्यक्षा मृणाल शेट्ये यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, संबंधित कर्मचाऱ्याविरोधात यापूर्वीही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. कोणत्याही कर्मचाऱ्याचा आर्थिक गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नसून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
देवरुख नगर पंचायतीमधील कर्मचाऱ्याकडून आर्थिक फसवणूक; नगराध्यक्षाकडे तक्रार







