रत्नागिरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी अत्यंत आनंदाची बातमी आहे. येथील मजगावचे सुपुत्र आणि उरण येथील सिटिझन्स हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचे कार्यतत्पर व नामांकित शिक्षक शोएब मुख्तार इब्जी यांची महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीच्या (महाराष्ट्र शासन) प्रतिष्ठित ‘आदर्श शिक्षक पुरस्कार – २०२३’ साठी निवड करण्यात आली आहे.
शैक्षणिक, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या अलौकिक योगदानाबद्दल हा सन्मान त्यांना जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीतर्फे २०२१, २०२२ आणि २०२३ या तीन वर्षांचे पुरस्कार अखेर जाहीर करण्यात आले असून, संशोधन समितीच्या सविस्तर शिफारसीनंतर अल्पसंख्याक कामकाज मंत्री मा. दत्तात्रेय भरणे साहेब आणि महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या पुरस्कार यादीस अंतिम मंजुरी दिली. शोएब इब्जी हे केवळ एक उत्कृष्ट आणि सक्रिय शिक्षकच नाहीत, तर ते प्रभावी वक्ते, प्रेरणादायी मार्गदर्शक, कवी, सूत्रसंचालक तसेच लेखक म्हणूनही परिचित आहेत. त्यांचे हे पुरस्कार त्यांच्या शैक्षणिक, साहित्यिक आणि सामाजिक योगदानाचे तसेच विद्यार्थी आणि समाजाच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे सन्मान आहेत. विशेष म्हणजे, उर्दू साहित्य अकादमीच्या स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षपूर्तीचे औचित्य साधून या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. हा भव्य व प्रतिष्ठित सोहळा ६ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर २०२५ दरम्यान दिमाखदार वातावरणात पार पडेल. या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनातील मान्यवर मंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांना प्रमाणपत्र आणि १५,००० रुपये रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे.
शोएब इब्जी यांची ही निवड केवळ त्यांची वैयक्तिक उपलब्धी नसून, त्यांच्या संपूर्ण इब्जी कुटुंबासाठी, ते कार्यरत असलेल्या संस्थेसाठी, आपल्या मजगांव गावांसाठी आणि संपूर्ण उर्दू वाचकांसाठी तसेच समाजासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. शोएब सरांनी नेहमीच विद्यार्थ्यांच्या भविष्यास योग्य दिशादर्शनासाठी मोलाचे कार्य केले आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण संस्थेलाही विशेष अभिमान वाटत असून, पुरस्काराच्या घोषणेनंतर शोएब इब्जी यांच्यावर सर्वत्रून हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन संदेशांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या बहुमानाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.