रायगड : जिल्ह्यात पावासाने धुमाकूळ घातला आहे. कर्जत, खालापूर, माणगाव, पोलादपूर तालुक्यांना पावसाचा जोरदार तडाखा बसला त्यामुळे जनजिवन विस्कळीत झाले. खोपोलीतील सखल भागात पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे.
तर भिरा धरणातून विसर्ग सुरु ४१.६० घन मीटर प्रती सेंकद वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कुंडलिका नदी किनाऱ्यांवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सकाळी आठ वाजे पर्यंत संपलेल्या २४ तासात ७०.७२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. माथेरान मध्ये सर्वाधीक १४४ मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला आहे. पोलादपूर मध्ये १२४ मिमी, कर्जत मध्ये १२२ मिमी, माणगाव मध्ये ९७ मिमी, पेण मध्ये ९४ मिमी, महाड मध्ये ८३ मिमी, खालापूर मध्ये ७५ मिमी, सुधागड ६३ मिमी, अलिबाग ५० मिमी पावसाची नोंद झाली.
हवामान विभागाने जिल्ह्याला दोन दिवसांना रेड अलर्ट जारी केला होता. गुरवारी सकाळच्या आणि दुपारच्या सत्रात फारसा पाऊस पडला नाही. मात्र संध्याकाळनंतर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्यास सुरूवात झाली. रात्रभर पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या, शुक्रवारी सकाळीही पावसाची संततधार कायम होती. त्यामुळे ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचणे, वृक्ष उन्मळून पडणे, वीज पूरवठा खंडीत होणे यासारख्या घटना घडल्या. अतिवृष्टीमुळे खोपोली शहरातीच्या सखल भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. विहारी, काटरंग परिसर जलमय झाला होता. त्यामुळे खोपोलीतील शाळांना स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन सुट्टीबाबत निर्णय घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या.
पावसाचा जोर वाढल्याने कुंडलिका, सावित्री, पाताळगंगा, अंबा नद्यांच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. भिरा धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले. ४१. ६० घन मीटर प्रती सेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे रोहा शहर आणि कुंडलिका नदी किनाऱ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर अंबा, पातळगंगा नद्यांही इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. आपत्कालीन परिस्थितीत ०२१४१-२२२११८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाने केले आहे.
मुसळधार पावसाचा रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना तडाखा
