रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील सहा संवर्गांतील ४७० शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या पूर्ण झाल्या आहेत. शुक्रवारी सायंकाळी बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले असून आता सातव्या टप्प्यातील बदली प्रक्रियेसाठी मार्ग मोकळा झाला आहे.
संवर्ग १ मध्ये दिव्यांग, गंभीर आजारी, अपंग, विधवा, परितक्त्या आणि ५३ वर्षांवरील शिक्षकांचा समावेश होता. संवर्ग २ अंतर्गत पतिपत्नी एकत्रीकरणासाठी ऑनलाईन अर्ज घेण्यात आले. संवर्ग ३ मध्ये अवघड क्षेत्रातील बदलीसाठी पात्र शिक्षकांचा समावेश असून २०२२ मधील अवघड क्षेत्रातील शाळांची यादी ग्राह्य धरली आहे.
संवर्ग ४ मध्ये एकाच शाळेत किमान ५ वर्षे किंवा अवघड क्षेत्रात १० वर्षे सेवा केलेल्या शिक्षकांना बदलीची संधी मिळाली. या टप्प्यातील बदल्या पूर्ण झाल्याने आता ५ वर्षांची सेवा पूर्ण न केलेल्या शिक्षकांना अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये जावे लागणार आहे. काही शिक्षकांनी या निर्णयाविरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता, मात्र स्थगिती उठवल्यानंतर सातव्या टप्प्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
सलग दोन वर्षे बदल्या होत असल्याने यंदा पात्र शिक्षकांची संख्या तुलनेने कमी राहिली. एखाद्या वर्षी बदल्या न झाल्यास अवघड क्षेत्रात काम करणारे अधिक शिक्षक एकाचवेळी बदलीसाठी पात्र ठरतात आणि प्रक्रिया लांबते. यंदा थोडा विलंब झाला असला, तरीही कमी शिक्षक पात्र ठरल्याने बदल्या सुरळीत पार पडल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या ४७० बदल्या पूर्ण
