GRAMIN SEARCH BANNER

राजापूर : नाटे येथे सेवानिवृत्त व्यक्तीचे बंद घर फोडून टीव्ही लंपास

Gramin Varta
134 Views

राजापूर: तालुक्यातील नाटे परिसरात नाणार पाळेकरवाडी येथील एका सेवानिवृत्त व्यक्तीच्या बंद घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. ११ मे २०२५ ते ९ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ही चोरी झाली असून, यात सुमारे ११,४०० रुपयांचा माल चोरीला गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

सुरेश मस्त प्रभ (वय ७४, सेवानिवृत्त, मूळ रा. गोरेगाव पूर्व, मुंबई, सध्या रा. नाणार पाळेकरवाडी, ता. राजापूर, जि. रत्नागिरी), यांनी याप्रकरणी नाटे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्यांची पत्नी मुंबई येथे गेले असताना त्यांच्या राजापूर येथील नाणार पाळेकरवाडी येथील घर बंद होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी ११ मे २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजेपासून ते ९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजेच्या दरम्यान घरफोडी केली.
चोरट्यांनी अत्यंत धाडसाने घरातील मुख्य दरवाजाची फळी चिऱ्याच्या दगडाने तोडून नुकसान केले आणि घराच्या मागील बाजूच्या उघड्या दरवाज्यातून आत प्रवेश केला. फिर्यादीच्या संमतीशिवाय अज्ञात इसमाने स्वतःच्या फायद्यासाठी घरातील वापरातील वस्तू चोरून नेल्या. चोरीला गेलेल्या मालामध्ये १०,००० रुपये किमतीचा एलजी कंपनीचा काळ्या रंगाचा स्मार्ट टीव्ही (मॉडेल नं. 32LG570BPSA), ९०० रुपये किमतीचा टाटा स्काय कंपनीचा सेटअप बॉक्स (Sub ID १५४५५४४३१२), आणि ५०० रुपये किमतीची लाल रंगाची लोखंडी एचपी गॅसची टाकी यांचा समावेश आहे. एकूण ११,४०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.

फिर्यादी सुरेश प्रभ हे १२ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ३.११ वाजताच्या सुमारास नाटे पोलीस ठाण्यात हजर झाले आणि त्यांनी ही फिर्याद दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा क्र. ७६/२०२५ भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०५, ३२४(४) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या घरफोडीच्या घटनेमुळे नाटे परिसरात खळबळ उडाली असून, बंद घरांना लक्ष करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीचा शोध पोलीस घेत आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास नाटे पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

3388195
Share This Article