रत्नागिरी: भारताच्या जनगणना २०२७ या महामोहिमेचा श्रीगणेशा झाला असून, चिपळूण तालुक्यातील मौजे दळवटणे गावाने या मोहिमेत ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. स्वगणना प्रक्रिया १००% पूर्ण करणारे हे रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले गाव ठरले असून, जिल्हा प्रशासनाकडून या यशाचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.
जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यातील घरयादी आणि घरगणनेची पूर्वतयारी म्हणून १ ते १५ मे २०२६ हा कालावधी ‘स्वगणना’ करण्यासाठी निश्चित करण्यात आला होता.
जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात या मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे. राज्याचे उद्योग आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी १ मे रोजी स्वतःची स्वगणना करून जिल्ह्यात या मोहिमेचा शुभारंभ केला होता. उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष उपक्रमासाठी दळवटणे गावाची निवड करण्यात आली होती. या गावाने विहित मुदतीत आपल्या सर्व ९ वाड्यांमधील ४२५ कुटुंबांची नोंदणी यशस्वीपणे पूर्ण केली आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार दळवटणे गावाची लोकसंख्या १८७१ इतकी होती. मात्र, नुकत्याच पूर्ण झालेल्या स्वगणनेच्या आकडेवारीनुसार गावची लोकसंख्या आता २२६२ वर पोहोचली असून एकूण कुटुंबांची संख्या ४२५ आहे. वाड्यांनिहाय तपशिलानुसार, शेट्येवाडी (१८), गणेशवाडी (५१), बागवाडी (६७), रामवाडी (१८), भुवडवाडी (६४), नलावडेवाडी (१०१), बडदेवाडी (३५), राजवाडा (२२) आणि बौद्धवाडी (४९) अशा सर्व ४२५ कुटुंबांची नोंदणी पूर्ण झाली आहे.
हे यश संपादन करण्यासाठी उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे आणि खेडर्डी मंडळाचे मंडळ अधिकारी नारायण चौधरी यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष क्षेत्रीय कामात प्रगणक वैशाली पेड्डेवाड, सचिन जाधव, प्रिया मोरे यांच्यासह मदतनीस शीतल कराडकर, रोशनी जाधव, ऋतुजा इंगवले, मेघना नलावडे, सुप्रिया बोबले, अर्चना जाधव, सीमा गमरे, सुवर्णा जाधव आणि पोलीस पाटील अमित मोहिते यांच्या पथकाने मोलाची भूमिका बजावली आहे. दळवटणे गावाने दाखवलेल्या या तत्परतेमुळे हे गाव आगामी जनगणनेसाठी संपूर्ण जिल्ह्यासाठी आदर्श ठरले आहे.






