चिपळूण : तालुक्यातील खडपोली येथे बुधवारी (८ ऑक्टोबर २०२५) भरधाव वेगात असलेल्या दुचाकीवरून पडून कविता आशिष राऊत (वय ३५, रा. कोळकेवाडी) ही महिला जखमी झाली. या प्रकरणी दुचाकी चालकावर अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारूच्या नशेत आणि बेदरकारपणे गाडी चालवल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनय विजय तांदळे (वय ३७, रा. अलोरे) असे गुन्हा दाखल झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. ८ ऑक्टोबर रोजी विनय तांदळे हा मद्यपान करून आपली दुचाकी खडपोली ते अलोरे या मार्गावर भरधाव वेगाने चालवत होता. या दुचाकीवर त्यांच्यामागे कविता राऊत बसल्या होत्या.
खडपोली येथील मारुती मंदिराजवळ असलेल्या स्पीड ब्रेकरवरून दुचाकी आदळल्याने पाठीमागे बसलेल्या राऊत यांना वेगाचा अंदाज न आल्याने त्या रस्त्यावर कोसळल्या. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. या अपघातासाठी बेजबाबदार आणि मद्यधुंद वाहन चालवण्यास कारणीभूत ठरल्याबद्दल विनय तांदळे यांच्यावर अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.