गुहागर/ उदय दणदणे: गुहागर तालुक्यातील पालशेत येथील तरुणांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘सहयोग फाऊंडेशन पालशेत’ या संस्थेने गावाच्या स्वच्छतेचा वसा घेतलेला असून, गणेशोत्सव २०२५ निमित्त त्यांनी पालशेत समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली. या स्तुत्य उपक्रमाने स्थानिकांमध्ये आणि पर्यटकांमध्येही जनजागृती निर्माण झाली आहे.
या संस्थेचे सदस्य दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात गावातील महत्त्वाच्या परिसराची स्वच्छता मोहीम राबवून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतात. या वर्षी, पर्यटकांचे खास आकर्षण असलेल्या पालशेतच्या समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत सहयोग फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय झिंबर यांच्यासह संस्थेचे अनेक सदस्य, पदाधिकारी आणि गावातील तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या उपक्रमासाठी समाजसेवक पंकज बिर्जे आणि नरेंद्र नार्वेकर यांनी विशेष मदत केली. त्यांनी मोहिमेत सहभागी झालेल्या सर्वांसाठी पाणी आणि नाश्त्याची सोय केली, ज्यामुळे तरुणाईला अधिक प्रोत्साहन मिळाले. तसेच, नितीन कानगुटकर यांनी या मोहिमेला भेट देऊन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना आणि सदस्यांना पालशेत गाव परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. ‘सहयोग फाऊंडेशन’च्या या समाजोपयोगी कार्यामुळे गावाच्या स्वच्छतेची जबाबदारी स्थानिक तरुणांनी उचलली असून, त्यांच्या या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.