GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वर : कानरकोंडच्या सड्यावर आढळली ऐतिहासिक वारसा असलेली दोन कातळ शिल्प, हजारो वर्षांचा इतिहास पुन्हा उजेडात

Gramin Varta
1k Views

समीर शिगवण / वांद्री : संगमेश्वर तालुक्यातील कानरकोंड गाव निसर्गरम्य डोंगर पठारावर वसलेले असून शांत आणि रम्य वातावरणासाठी ओळखले जाते. मात्र या गावाच्या कुशीत दडलेला एक प्राचीन इतिहास आतापर्यंत दुर्लक्षित राहिला होता. नुकताच कानरकोंड चोळ परिसरात सापडलेली कातळशिल्पे या गावाला ऐतिहासिक वारशाची नवी ओळख देणारी ठरत आहेत.

या ठिकाणी दोन कातळशिल्पे आढळून आली असून, त्यापैकी एक माशाच्या आकाराचे तर दुसरे मानवाकृती स्वरूपातील आहे. या शिल्पांचा शोध स्थानिक ग्रामस्थांना लागला. साध्या कातळावर कोरलेली ही चिन्हे हजारो वर्षांपूर्वीच्या मानवी संस्कृतीची साक्ष देतात. त्यामुळे कानरकोंड परिसरात आदिमानवाचा वावर होता, हे आता स्पष्टपणे समोर येत आहे.

गावाच्या आसपासच्या कातळांवर कोरलेली ही शिल्पे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहेत. मासा, पदचिन्हे तसेच विविध भूमितीय आणि प्रतीकात्मक आकृती येथे दिसून येतात. कोणतीही आधुनिक साधने नसताना दगडावर घडवलेली ही कला त्या काळातील मानवाची कल्पनाशक्ती, श्रद्धा आणि जीवनदृष्टी अधोरेखित करते.

कातळावर कोरलेली माशाची आकृती विशेष लक्ष वेधून घेणारी आहे. पाण्याशी निगडित असलेला मासा हा जीवन, समृद्धी आणि अन्नस्रोत यांचे प्रतीक मानला जातो. त्या काळात नदी, ओढे किंवा समुद्राच्या सान्निध्यात मानवी वस्ती असावी, तसेच मासेमारी हा उपजीविकेचा प्रमुख आधार असण्याची शक्यता या शिल्पांतून व्यक्त होते. पाणी म्हणजेच जीवन, या भावनेतून माशाला पवित्र स्थान दिले गेले असावे, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

पदचिन्हांची कोरीव कामेही तितकीच अर्थपूर्ण मानली जातात. ही पदचिन्हे एखाद्या देव, संत किंवा महान व्यक्तीच्या स्मरणार्थ कोरलेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखाद्या व्यक्तीची उपस्थिती, प्रवासाचा मार्ग किंवा त्या स्थळाचे पवित्रत्व दर्शवणारी ही चिन्हे भारतीय सांस्कृतिक परंपरेशी जोडलेली असल्याचे जाणवते. आजही देवांच्या पावलांचे ठसे पूजनीय मानले जातात, हीच परंपरा या कातळांवर उमटलेली दिसते.

याशिवाय काही अस्पष्ट आणि रहस्यमय आकृतीही आढळतात. या आकृती नकाशासारख्या, धार्मिक विधींचे चित्रण करणाऱ्या, खगोलाशी संबंधित किंवा तत्कालीन समाजरचनेचे संकेत देणाऱ्या असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ही कातळशिल्पे केवळ दगडावरील कोरीव काम न राहता, आपल्या पूर्वजांच्या जीवनशैलीची, श्रद्धेची आणि सांस्कृतिक जाणिवांची जिवंत साक्ष ठरतात.

स्थानिक जाणकारांच्या मते, या परिसरात अधिक सखोल शोध घेतल्यास आणखी कातळशिल्पे सापडण्याची दाट शक्यता आहे. कानरकोंडमधील हा ऐतिहासिक ठेवा आपल्या भूतकाळाशी जोडणारा एक मौल्यवान दुवा असून, त्याचे संरक्षण, संवर्धन आणि शास्त्रीय अभ्यास होणे अत्यंत गरजेचे आहे. हा वारसा जपण्यासाठी प्रशासनासह स्थानिक समाजानेही पुढाकार घेण्याची गरज आता प्रकर्षाने जाणवू लागली आहे.

Total Visitor Counter

3200535
Share This Article