GRAMIN SEARCH BANNER

चैतन्य फाउंडेशन मार्फत प्राथमिक शाळांसाठी साहित्य वितरण, 600 विद्यार्थांना लाभ

संस्थापक अध्यक्ष प्रथमेश तेंडुलकर यांचा पुढाकार

उद्योजक ऋषिनाथ पत्त्याणे, प्रमिल पत्त्याणे यांनी दिला मुलांना खाऊ

रत्नागिरी: गरजू होतकरू तसेच ग्रामीण भागातल्या मुलांच्या शिक्षणास हातभार लागावा या हेतूने चैतन्य सोशल वेल्फेअर फाउंडेशन मुंबई यांच्यावतीने अनुक्रमे लांजा व रत्नागिरी तालुक्यातील हर्चे, खानवली तसेच गावडे आंबेरे केंद्रातील सुमारे सहाशे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच दप्तर वाटप करण्यात आले. यावेळी चैतन्य फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रथमेश तेंडुलकर, कार्यवाह वैभव भुजबळ, सदस्य
पराग जोशी, रिया देसाई,सिद्धार्थ पांचाल, कार्तिक नादार, स्नेहा शेलार उपस्थित होते.
 
या कार्यक्रमाच्या निमित्ताने फाउंडेशन मार्फत ग्रामीण भागामध्ये केली जाणारी मदत ही केवळ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी आणि विकासासाठी असल्याचे सांगत भडे गावचे माजी सरपंच सुधीर तेंडुलकर यांनी चैतन्य परिवाराची मेहनत आणि तरुण तडफदार कार्यकर्त्यांच्या योगदानाचे कौतुक केले. आदर्श शाळा नाखरे नं. १ चे पदवीधर शिक्षक सुहास वाडेकर यांनी पालकांना मार्गदर्शन करताना मुलांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी जिल्हा परिषद शाळा सक्षम असून पालकांनी मुलांकडे वेळात वेळ काढून लक्ष देण्याचे आवाहन केले.

  दरम्यान पावस केंद्रातील काही शाळांप्रमाणेच हर्चे तसेच गावडे आंबेरे केंद्रातील शाळांना संगणक आणि स्मार्ट टीव्ही देण्यासाठी भविष्यात चैतन्य सोशल वेल्फेअर फाउंडेशन सहाय्य करणार असल्याचे सांगून उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते ऋषीनाथ पत्त्याणे,प्रमिल पत्त्याणे यांनी उपस्थित विद्यार्थी आणि पालकांचे तोंड गोड करण्यासाठी आर्थिक निधी देऊन सहकार्य केल्याबद्दल संस्थापक अध्यक्ष  प्रथमेश तेंडुलकर यांनी विशेष आभार व्यक्त केले. मावळंगे क्र. १ शाळेचा विद्यार्थी अन्वित विकास लाखण याचे मनोगत तसेच तिन्ही केंद्रातील शिक्षकवर्ग, कार्यक्रम संयोजन करणारे मुख्याध्यापक मिरजकर, लीलाधर कूड, संदीप पावसकर, शरदचंद्र लेले उपस्थित पालक, शिक्षणप्रेमी ग्रामस्थ यांचेही त्यांनी अभिनंदन केले.
 
  मुंबईमध्ये वास्तव्य करताना गोरगरीब गरजू ग्रामीण मुलांकडे आवर्जून लक्ष ठेवणाऱ्या या संस्थेचे व्यासपीठावर उपस्थित शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप मयेकर, मयुरी आडविलकर,केंद्रप्रमुख सुहास आयरे, नरेंद्र पवार, उत्कर्षा शिंदे, हर्चे सरपंच दीप्ती तरळ, गावडे आंबेरे सरपंच लक्ष्मण सारंग,शिवार आंबेरे सरपंच राजन रोकडे,मावळंगे सरपंच नम्रता बिर्जे,जितेंद्र शिर्सेकर, संजीवकुमार राऊत यांनी आभार व्यक्त केले आहेत. आपल्या शाळेत शिकणाऱ्या विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची कमतरता भासू नये, यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व शिक्षकांचे पंचायत समिती शिक्षण विभाग रत्नागिरी पावस बीट विस्तार अधिकारी भाग्यश्री हिरवे, गटशिक्षणाधिकारी डॉ. डी. बी. सोपनूर, लांजा गटशिक्षणाधिकारी विनोद सावंग यांनी विशेष कौतुक केले आहे.

Total Visitor Counter

2475437
Share This Article