पाचल/नितिश खानविलकर :कै. ज्ञा.म. नारकर वाचनालय पाचल आयोजित कथाकथन आणि वक्तृत्व स्पर्धा ग्रामपंचायत पाचल येथील स्वातंत्र्य सैनिक कै. गोपाळ उर्फ आबा नारकर सभागृहात पार पडला. इयत्ता पाचवी ते सातवीसाठी कथाकथन आणि आठवी ते दहावीसाठी वक्तृत्व स्पर्धा असे स्पर्धेचे स्वरूप होते. पाचल पंचक्रोशीतील विविध प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील मुले या स्पर्धेत सहभागी झाली होती.
पाचवी ते सातवी या कथाकथन स्पर्धेत कोळंब येथील मानसी विश्वनाथ पाटेकर हिने प्रथम क्रमांक पटकावला. पाचल हायस्कूलच्या नीती रामचंद्र मोरे आणि कोळंबच्या श्रावणी जगन्नाथ पाटेकर यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक प्राप्त केला. अजीवली शाळा नं १ ची आर्या अनंत माने आणि परुळे नं ३ ची आराध्या नितीन बदडे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. आठवी ते दहावी या गटात वक्तृत्व स्पर्धेत रायपाटण हायस्कूलच्या किमया मुकेश शेट्ये हिने प्रथम क्रमांक पटकावला तर ताम्हाणे हायस्कूलच्या पार्थवी प्रकाश कदम आणि श्रावणी दिलीप चव्हाण यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. पाचल हायस्कूलची श्रावणी महेंद्र किंजळस्कर आणि मुर हायस्कूलची नजत अस्लम काझी यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
पाचल हायस्कूलचे सिद्धार्थ जाधव सर, ताम्हाणे हायस्कूलच्या शिंदे मॅडम आणि प्राथमिक शिक्षक भांडेकर सर यांनी कथाकथन स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले तर संदीप परटवलकर, नितीन पांचाळ आणि विजय कुवळेकर यांनी वक्तृत्व स्पर्धेच्या परीक्षक पदाची धुरा सांभाळली. आणि सर्व सहभागी विद्यार्थ्यांना विविध बारकावे सांगत बहुमोल मार्गदर्शन केले. प्रथम क्रमांकासाठी १०००, द्वितीय ७५०, तृतीय ५०० आणि उत्तेजनार्थ २५० रुपये रोख, पुस्तक आणि प्रमाणपत्र असे बक्षिसांचे स्वरूप होते तर बक्षीस स्वरूपात सर्व सहभागी स्पर्धकांना वाचनालयाचे एक वर्षासाठी मोफत सदस्यत्व देण्याचे अध्यक्ष्यांनी नमूद केले.
सदर कार्यक्रम अजित दादा नारकर, विंदा साखळकर, राजपूत सर, मलुष्टे परिवार यांच्या सौजन्याने पार पडला. पाचलचे सरपंच बाबालाल फरास, प्रशांत रेडीज, वाचनालयाचे अध्यक्ष किशोर ज्ञा. नारकर, उपाध्यक्ष राजन लब्दे, खजिनदार शिरीष सक्रे, ग्रंथपाल विठोबा चव्हाण, लिपिक सानिका दळवी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचनालयाचे कार्यवाह विनायक खानविलकर यांनी केले. कार्यक्रमासाठी जयेश तेलंग, सुभाष सरफरे, नितिश खानविलकर, रविउदय पांचाळ यांनी सहकार्य केले.