मनसेने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर प्रशासनाने दिले चौकशीचे आदेश
उदय दणदणे/गुहागर : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत शाळांमध्ये पुरवण्यात येणारा पोषण आहार अंतीम मुदतपूर्व कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये आढळून आल्याची घटना समोर आली आहे.
गुहागर तालुक्यातील जानवळे फाटा येथे रस्त्यालगत असणाऱ्या कचऱ्यामध्ये पोषण आहाराची पॅकेट टाकल्याचे दिनांक १० जुलै २०२५ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या निदर्शनास आल्याने जानवळकर यांनी आक्रमक भूमिका घेत सदर पोषण आहार शाळेचा आहे की अंगणवाडीचा ?असा प्रश्न उपस्थित करत शासनाने याप्रकरणी तात्काळ चौकशी करून पोषण आहार कचऱ्यात टाकणाऱ्या संबंधितांवर कडक कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक भूमिका घेईल असा इशारा जानवळकर यांनी प्रशासनाला दिला होता.
गुहागर मनसेने आक्रमक पवित्रा घेतल्याने प्रशासन खडबडून जागे झाले असून शुक्रवार दिनांक ११ जुलै २०२५ रोजी पंचायत समिती गुहागर गट विकास अधिकारी शेखर भिलारे यांनी घटनास्थळी पहाणी करून पोषण आहाराच्या खिचडीचे पॅकेट ताब्यात घेतले आहे,पुढील कारवाईसाठी तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत.