GRAMIN SEARCH BANNER

चिपळूणमध्ये ‘आनंदयात्री पु. ल.’ कार्यक्रमातून पुलंच्या स्मृतीला नमन

Gramin Varta
15 Views

चिपळूण : पु. ल. देशपांडे यांच्या पंचविसाव्या स्मृतीवर्षानिमित्त अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या चिपळूण शाखेतर्फे ‘आनंद यात्री पु. ल.’ या आगळ्यावेगळ्या सांस्कृतिक नाट्यप्रयोगातून श्रद्धांजली वाहिली

चिपळूणच्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेले नाट्यप्रवेश, नृत्य, गीत आणि व्यक्तिचित्रांचे सुरेख सादरीकरण या प्रयोगात करण्यात आले. चिपळूणमधील रसिकांनी स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना भरभरून दाद दिली. नाट्य परिषदेने सादर केलेला हा कार्यक्रम चिपळूणच्या सांस्कृतिक चळवळीसाठी उभारी देणारा ठरला. अनेक जुन्या व नव्या कलाकारांनी एकत्र येत रंगमंचावर जिवंतपणे अभिनय साकारला आणि तो प्रयोग हाउसफुल ठरून, एक संस्मरणीय विक्रम ठरला.

कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ रंगकर्मी कांता कानिटकर यांच्या हस्ते रंगमंच पूजनाने झाली. त्यानंतर नांदी सादर करण्यात आली. डॉ. प्रशांत पटवर्धन आणि स्नेहल जोशी यांनी अनुक्रमे पु. ल. आणि सुनीताबाईंच्या भूमिका साकारत ‘आनंदयात्री पु. ल.’ या प्रवासाची सुरुवात केली. त्यानंतर पु. ल. यांच्या रत्नागिरीत झालेल्या लग्नाचा प्रसंग सादर झाला. या प्रवेशात संजय सरदेसाई, मधुरा बापट, सुनेत्रा आपटे, श्रीकांत फाटक, संदीप जोशी, अजय यादव, मंगेश बापट, आदित्य बापट, शोम पाथरे आणि दिलीप आंब्रे यांनी भूमिका साकारल्या. सुमंता केळकर यांनी तरुणपणीचे पु. ल. साकारले. या प्रवेशाचे लेखन मंदार ओक यांनी केले होते.दिलीप आंब्रे दिग्दर्शित ‘नारायण’ या पात्राच्या प्रवेशात दिलीप आंब्रे यांनी दमदार अभिनय केला. त्यांना संजय सरदेसाई, सुनेत्रा आपटे, विभावरी रजपूत, प्राची जोशी, विभावरी जाधव, संदीप जोशी, अजय यादव, मंगेश बापट, शरद तांबे, आर्या पोटे यांनी साथ दिली.यानंतर अंतू बरवा आणि मध्यमवयीन पु. ल. देशपांडे रंगमंचावर आले. संतोष केतकर यांनी पु. ल. तर कांता कानिटकर यांनी अंतू बरवा साकारला. दुकानदाराच्या भूमिकेत संजय कदम यांनी साथ दिली. प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात या प्रवेशाचे स्वागत केले.

पुढे सादर झालेल्या ‘साक्ष’ या विनोदी प्रवेशात महाद्या या साक्षीदाराची भूमिका योगेश बांडागळे यांनी साकारली. त्यांच्या सहज अभिनयाला रसिकांची विशेष दाद मिळाली. वकील अजय यादव, न्यायाधीश श्रवण चव्हाण आणि अभय दांडेकर यांनीही प्रभावी भूमिका साकारल्या.या दरम्यान, प्रेमजीबाई आसर प्राथमिक विद्यालयातील २२ विद्यार्थ्यांनी ‘नाच रे मोरा’ या गाण्यावर नृत्य सादर केले. या नृत्याचे दिग्दर्शन श्रीमती बेदरकर यांनी केले होते. नृत्यप्रयोगाने वन्स मोअर मिळवून, प्रेक्षकांना त्यांच्या बालपणीच्या आठवणीत रमवले. मध्यंतरानंतर पुलंनी लिहिलेली आणि संगीतबद्ध केलेली गाणी सादर झाली. आनंद पाटणकर, अनामय बापट आणि अश्विनी वैद्य यांनी गाणी सादर केली, तर त्यांना संगीत साथ संतोष करंदीकर आणि अभय खांडेकर यांनी केली.

यानंतर ‘तुज आहे तुजपाशी’ या नाटकातील प्रवेश सादर झाला. दिग्दर्शक कांता कानिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगीता पालकर, रंजना वाडकर, संगीता जोशी, स्कंधा चितळे आणि श्रवण चव्हाण यांनी भूमिका साकारल्या. या प्रवेशालाही रसिकांकडून दाद मिळाली. त्यानंतर मंदार ओक दिग्दर्शित ‘ती फुलराणी’ हा प्रवेश सादर करण्यात आला. ऋचा भागवत हिने साकारलेली फुलराणी ही भूमिका रसिकांच्या विशेष पसंतीस उतरली. मंदार ओक आणि मंगेश बापट यांनीही प्रभावी अभिनय सादर केला. कार्यक्रमाच्या शेवटी पु. ल. आणि सुनीताबाईंच्या मनोगतातून त्यांच्या सहजीवनाचा भावनिक पट सादर करण्यात आला आणि त्याने संपूर्ण कार्यक्रमाला एका अर्थपूर्ण सांगतेची गोड झळाळी दिली.कार्यक्रमाचे निवेदन प्रकाश गांधी व सोनाली खर्चे यांनी खुमासदार शैलीत केले. प्रकाशयोजना उदय पोटे, ध्वनी संयोजन कमलेश कोकाटे, पार्श्वसंगीत संस्कार लोहार व अतिश तांबे, नेपथ्य संतोष केतकर आणि रंगभूषा शेखर दांडेकर यांनी केली.

Total Visitor Counter

2648855
Share This Article