चार जणांना पोलीस कोठडी, भडकंब्यातील दोघांचा समावेश
देवरुख:- शहरातील सोन्याचे व्यापारी धनंजय केतकर अपहरण प्रकरणी पोलिसांनी गुरुवारी आणखी दोघांना ताब्यात घेतले आले आहे. यातील एक स्थानिक व दुसरा मुंबईचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयितांची संख्या सहा झाली आहे.
अपहरण प्रकरणात भडकंबा येथील प्रणित संजय दुधाणे (३० पटवाडी), राजेश अनंत नवाले (३५, नवालेवाडी) व दीपक राजेश लोहिरे (३७, बदलापूर पूर्व – ठाणे,), विशाल मनोहर आचार्य (४५, आपटेवाडी बदलापूर पूर्व – ठाणे) यांना अटक करण्यात आली. देवरुख न्यायालयात या चौघांनाही हजर करण्यात आले असता न्यायाधीशांनी २६ रोजीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
केतकर हे चारचाकी वाहनाने १७ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास साखरपाहून देवरुखच्या दिशेने परतत असताना वांझोळे येथे अज्ञातांनी अपहरण केले. त्यांच्याकडील १४ लाखाचे दागिने व २० हजार रुपये रक्कम काढून घेऊन वाटूळ येथे सोडले. केतकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञातांवर देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा व देवरुख पोलीस या घटनेचा कसून तपास करत होते. मंगळवारी या घटनेच्या पार्श्वभूमीवर चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोन स्थानिक तरुणांचा यामध्ये समावेश आहे.
सोने व्यापारी अपहरण प्रकरणी आणखी दोन संशयित ताब्यात
