रत्नागिरी : समुद्रात सागर कवच अभियान संपन्न

saurabhsalvi26@gmail.com
3 Min Read

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी हद्दीत सुरक्षा यंत्रणांची सतर्कता आणि सज्जता तपासण्यासाठी राबवण्यात आलेले ‘सागर कवच अभियान – ०२/२५’ यशस्वीरित्या संपन्न झाले आहे. भारतीय तटरक्षक दल, रत्नागिरी पोलीस आणि इतर सुरक्षा संस्थांनी संयुक्तपणे राबवलेल्या या मोहिमेदरम्यान, शत्रू पक्षाची भूमिका वठवणाऱ्या ‘रेड फोर्स’चा घुसखोरीचा प्रयत्न सुरक्षा दलाच्या ‘ब्लू फोर्स’ने उधळून लावत ही मोहीम फत्ते केली. दिनांक १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजेपासून ते २० नोव्हेंबर सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे अभियान महाराष्ट्र आणि गोवा राज्यात एकाच वेळी राबवण्यात आले.

सागरी मार्गाने होणारी संभाव्य घुसखोरी आणि दहशतवादी कारवाया रोखणे, तसेच युद्धजन्य परिस्थितीत विविध विभागांमधील समन्वय तपासणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता. या मोहिमेत रत्नागिरी पोलीस दलासह तटरक्षक दल, नौदल, कस्टम विभाग, बंदर विभाग, मत्स्य विभाग, आणि समुद्र किनाऱ्यावरील खासगी जेट्टी आस्थापनांनी सक्रिय सहभाग नोंदवला. अभियानादरम्यान १९ नोव्हेंबर रोजी दुपारी सव्वा एकच्या सुमारास एक थरारक प्रात्यक्षिक पार पडले. शत्रू पक्ष अर्थात ‘रेड फोर्स’ने एका बोटीद्वारे रत्नागिरी किनाऱ्याच्या दिशेने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, समुद्रात गस्त घालणाऱ्या सुरक्षा एजन्सीच्या (ब्लू फोर्स) ‘आई लाभ-लक्ष्मी’ या ट्रॉलरवरील पथकाला रडारवर संशयास्पद हालचाली दिसून आल्या.

अत्यंत तत्परतेने हालचाली करत सुरक्षा दलाने रत्नागिरी लाईट हाऊससमोरील अरबी समुद्रात, किनाऱ्यापासून सुमारे साडेतीन नॉटिकल मैल अंतरावर या संशयास्पद बोटीला घेराव घातला. ‘नवदुर्ग’ (IND-MH-06-199 | 09) असे नाव असलेल्या या बोटीवर सुरक्षा रक्षकांनी चढून झडती घेतली असता, त्यात अभियानातील ६ संशयित इसम आढळून आले. ‘ब्लू फोर्स’ने या सर्वांना वेळीच ताब्यात घेत घुसखोरीचा हा प्रयत्न अयशस्वी केला. या कारवाईमुळे रत्नागिरीच्या सागरी सुरक्षा यंत्रणेची तत्परता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

या मोहिमेची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेता प्रशासनाने प्रचंड मोठा फौजफाटा तैनात केला होता. या अभियानात ४८ पोलीस अधिकारी, ४६४ पोलीस अंमलदार, १०० होमगार्ड, ४७ सुरक्षा वार्डेन, ४१ सागर रक्षक दलाचे सदस्य आणि ४४ पोलीस पाटील अहोरात्र कार्यरत होते. विशेष म्हणजे या सुरक्षा कवायतीमध्ये एन.सी.सी. चे ४० कॅडेट आणि एन.एस.एस. चे ६८ विद्यार्थी देखील उत्साहाने सहभागी झाले होते. समुद्रात गस्त घालण्यासाठी दोन खासगी ट्रॉलर्स अधिग्रहित करण्यात आले होते.

या दोन दिवसांच्या कालावधीत केवळ समुद्रातच नव्हे, तर जमिनीवरही कडेकोट तपासणी करण्यात आली. पोलीस आणि सुरक्षा दलांनी मिळून जिल्ह्यात तब्बल ४ हजार ७८७ वाहनांची आणि ९ हजार ७८९ संशयास्पद व्यक्तींची तपासणी केली. सागरी हद्दीत मच्छीमार आणि इतर ८० बोटींची तपासणी करून त्यावरील ९६० खलाशी व व्यक्तींची शहानिशा करण्यात आली. सर्व विभागांच्या उत्तम समन्वयामुळे हे अभियान यशस्वी ठरले असून, रत्नागिरीची किनारपट्टी सुरक्षित असल्याचे यातून सिद्ध झाले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *