GRAMIN SEARCH BANNER

जिल्हा क्रीडा संकुलातील सुविधा आता बाह्य यंत्रणेऐवजी प्रशासनच चालवणार; पालकमंत्री उदय सामंत यांचा धोरणात्मक निर्णय

Gramin Varta
81 Views

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा क्रीडा संकुलाच्या माध्यमातून खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या जलतरण तलाव, व्यायामशाळा, तायक्वांदो हॉल, बॅडमिंटन आणि बास्केटबॉल कोर्ट यांसारख्या प्रमुख सुविधा आता कोणत्याही खासगी किंवा बाह्य यंत्रणेला न देता जिल्हा क्रीडा संकुल प्रशासन स्वतः चालवणार आहे. पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे पार पडलेल्या जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे खेळाडूंना दर्जेदार सोयीसुविधा थेट शासकीय नियंत्रणाखाली उपलब्ध होणार असून, खेळाडूंसाठी उत्तम प्रशिक्षकांची नेमणूक करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

या बैठकीला आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हा क्रीडा संकुलातील फ्लोअरिंगच्या कामासाठी १ कोटी ९८ लाख रुपयांची निविदा स्थानिक स्तरावर प्रसिद्ध करून तातडीने काम पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. क्रीडा संकुलाचे सेवाशुल्क आणि अग्निशमन सेवा शुल्क माफ करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला, ज्यामुळे स्थानिक खेळाडूंना मोठा दिलासा मिळणार आहे.

क्रीडा संकुलासोबतच मालगुंड येथील प्राणी संग्रहालयाची निविदा प्रक्रिया पुढील आठवड्यात पूर्ण करण्याचे आदेश देतानाच, एमआयडीसी परिसरातील अतिक्रमणे आणि अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज ग्रंथालय, ध्यान केंद्र, अल्पसंख्यांक वसतिगृह आणि एनसीसी इमारत यांसारख्या विविध विकासकामांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला.

Total Visitor Counter

3372445
Share This Article