ग्रामीण वार्ताने उठवला आवाज, संजय झोरे यांनी ऑनलाईन केलेल्या तक्रारीने सा. बा. विभाग खडबडून जागे, दिले लेखी पत्र
तुषार पाचलकर /राजापूर
तालुक्यातील मूर कोलतेवाडी येथील महत्त्वाच्या पुलाचे काम तब्बल दोन वर्षांपासून रखडलेले आहे. ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे आणि ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे शाळकरी मुले, शेतकरी आणि स्थानिक ग्रामस्थांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत. मुसळधार पावसात ग्रामस्थांचा या मार्गावरून प्रवास थांबत असल्याने अनेक गावांशी संपर्क तुटतो. याबाबत वारंवार आवाज उठवूनही सा. बा. विभाग आणि लोकप्रतिनिधींनी दुर्लक्षच केले होते. शेवटी ग्रामीण वार्ताने ग्रामस्थांच्या समस्येविषयी सडेतोड वृत्त प्रकाशित करताच, ग्रामस्थ आक्रमक झाले. पाचल पंचक्रोशी धनगर समाजाचे सल्लागार संजय कोंडीबा झोरे यांनी आपले सरकारवर ऑनलाइन तक्रार दाखल करताच ठेकेदार आणि सा. बा. विभागाची लक्तरे टांगली गेली. यामुळे संबंधित विभागला जाग आल्याने त्वरित झोरे यांना लेखी पत्र देत 6 महिन्यात काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. ग्रामीण वार्ताच्या वृत्तामुळे काम मार्गी लागत असल्याने ग्रामस्थानी समाधान व्यक्त केले.
सततच्या पावसामुळे मूर येथील जुना पूल वाहतुकीसाठी बंद पडला आणि काजीर्डा, कोळंब, मूर या गावांचा संपर्क अनेकदा तुटला. ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही पीडब्ल्यूडी आणि ठेकेदार आर. के. सावंत यांनी कानाडोळाच केला.
या दिरंगाईविरोधात स्थानिक ग्रामस्थ व राजापूर तालुका धनगर समाजाचे सचिव तसेच पाचल पंचक्रोशी धनगर समाजाचे सल्लागार संजय कोंडीबा झोरे यांनी 19 ऑगस्ट 2025 रोजी “आपलं सरकार” पोर्टलवर ऑनलाईन तक्रार दाखल केली.
ग्रामस्थांच्या दबावाखाली अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने जाग येत 6 ऑक्टोबर 2025 पासून पुलाचे बांधकाम सुरू करून 31 मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन संजय झोरे यांना दिले. याची प्रत ठेकेदार आर. के. सावंत तसेच रत्नागिरीचे सुप्रिंटेंडिंग इंजिनियर यांनाही देण्यात आली आहे.
राजापूर मूर येथील पुलाचे काम दोन वर्षांपासून रखडले; ग्रामस्थांच्या संतापानंतर 6 महिन्यात काम मार्गी लावण्याचे बांधकाम विभागाचे आश्वासन
