चिपळूण: कोकणातील प्रतिदक्षणी काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र टेरव येथील आद्यशक्ती कुलस्वामिनी श्री भवानी-वाघजाई शक्तीपिठाचा १५ वा वर्धापन दिन सोहळा येत्या शुक्रवारी, ८ मे २०२६ रोजी अत्यंत दिमाखात साजरा केला जाणार आहे. निसर्गरम्य देवरहाटीमध्ये वसलेल्या या मंदिराचा ऐतिहासिक वारसा ५०० वर्षांहून अधिक जुना असून, या मंगल दिनानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
ऐतिहासिक नोंदीनुसार, श्री भवानी जगदंबा आणि श्री वाघजाई मातेसह इतर देवतांची स्थापना सन १५१० ते १५१२ च्या कालखंडात करण्यात आली होती. १८३९ मध्ये या मंदिराचा पहिला जीर्णोद्धार झाला होता, तर ८ मे २०११ रोजी कोल्हापूर करवीर पीठाचे श्रीमंत जगद्गुरू शंकराचार्य आणि ह.भ.प. भारती महाराज यांच्या उपस्थितीत नूतन मंदिराचे कलशारोहण संपन्न झाले होते. स्थापत्यशास्त्राचा अजोड नमुना असलेल्या या भव्य मंदिराने अल्पावधीतच महाराष्ट्रातील पर्यटनात महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे. शासनाने या देवस्थानास पर्यटन स्थळाचा ‘क’ आणि तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा बहाल केल्याने या भागाचा विकास झपाट्याने होत आहे.
वर्धापन दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी सकाळी देवतांचे अभ्यंगस्नान, अभिषेक, नवचंडी याग आणि हवनाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी महाआरतीनंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून, सायंकाळी महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ आणि रात्री भजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. नागमोडी रस्ते, प्रशस्त उद्यान आणि नवदुर्गांच्या आकर्षक मूर्तींमुळे टेरव हे केवळ धार्मिक केंद्रच नव्हे, तर पर्यटकांच्या पसंतीचे ठिकाण ठरले आहे. या सोहळ्याला परिसरातील भाविकांनी सहपरिवार उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त टेरव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.




