GRAMIN SEARCH BANNER

पोलीस अधीक्षकांकडून दापोली पोलीस ठाण्याचे वार्षिक निरीक्षण; ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत अमली पदार्थांविरोधात कडक कारवाईचे आदेश

Gramin Varta
145 Views

दापोली: रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांनी गुरुवारी दापोली पोलीस ठाण्याला भेट देऊन वार्षिक निरीक्षण तपासणी केली. या दौऱ्यात त्यांनी केवळ पोलीस कामकाजाचा आढावा घेतला नाही, तर स्थानिक नागरिक आणि पोलीस पाटलांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पोलीस ठाण्यातील विविध विभागांची पाहणी करताना त्यांनी दाखल गुन्ह्यांची सद्यस्थिती, प्रलंबित तपास, मुद्देमाल निर्गती आणि प्रतिबंधात्मक कारवायांची सविस्तर माहिती घेतली. पोलीस दलात शिस्त ही अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद करत त्यांनी नागरिकांच्या तक्रारींकडे तत्परतेने लक्ष देण्याच्या स्पष्ट सूचना सर्व अधिकारी व अंमलदारांना दिल्या. विशेषतः सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे आणि ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत अमली पदार्थ खरेदी-विक्री व सेवनाविरोधात कडक मोहीम राबवण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.

दापोली हे पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र असल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी प्रभारी अधिकाऱ्यांना दिले. कामकाजाच्या आढाव्यानंतर पोलीस अधीक्षक बगाटे यांनी पोलीस अंमलदारांशी संवाद साधून त्यांच्या कौटुंबिक व आरोग्यविषयक समस्या जाणून घेतल्या, तसेच नवीन पोलीस वसाहतीच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर आयोजित नागरिक व पोलीस पाटील यांच्या बैठकीत त्यांनी कायदा-सुव्यवस्था, वाहतूक नियम, महिला सुरक्षा आणि सोशल मीडियाचा सुरक्षित वापर यावर मार्गदर्शन केले. कोणत्याही संशयास्पद घटनेची माहिती देण्यासाठी नागरिकांनी ‘डायल ११२’ या क्रमांकाचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. या प्रसंगी खेड उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सनस, दापोलीचे प्रभारी अधिकारी महेश तोरस्कर आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Total Visitor Counter

3370372
Share This Article