वाटद कवठेवाडी शाळेत सलग १२ तास वाचन वर्गाचे आयोजन संपन्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अनोख्या पद्धतीने वाचनातून अभिवादन
खंडाळा : आधुनिक भारताचे शिल्पकार, महामानव, विश्ववंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य हे सर्वांसाठीच दिशादर्शक असून, त्यांचे अमूल्य विचार हे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि प्रेरणादायी आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य, हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात दिशादर्शकाचे काम करणारे आहेत. म्हणून विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार स्वीकारण्यासाठी त्यांच्या चरित्राचे, कार्याचे आणि इतर पुस्तकांचे वाचन करून स्वतःला समृद्ध करण्याची आवश्यकता असल्याचे मत बौद्धजन पंचायत समिती रत्नागिरी तालुक्याचे तालुकाध्यक्ष प्रकाश पवार यांनी व्यक्त केले.
ते जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी या शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्ताने शालेय व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी संघ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सलग १२ तास वाचन उपक्रमाच्या समारोप प्रसंगी बोलत होते.ते पुढे म्हणाले की, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी शाळेने राबविलेला सलग १२ तास वाचनाचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आणि अनुकरणीय असल्याचे गौरवोद्गार काढण्यात आले.
या उपक्रमाच्या समारोप प्रसंगी उपस्थित असणारे राज्यस्तरीय क्रीडा शिक्षक डॉ. राजेश जाधव यांनीही यावेळी उपक्रमाचे कौतुक करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे महत्व पटवून दिले. ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या संघर्षाची जगातील कुणीही केला नाही. म्हणूनच त्यांना सिम्बॉल ऑफ नॉलेज असे म्हटले जाते. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन त्यांनी आपल्या ज्ञानाच्या माध्यमातून आधुनिक भारताच्या विकासाचा पाया रचला. त्यांनी आपल्या आयुष्यात अस्पृशोद्धाराचे कार्य करण्याचे ध्येय निश्चित केले आणि त्यानुसार त्यांनी कार्य केले. म्हणूनच आज संपूर्ण जगभरात त्यांची जयंती उत्साहात साजरी केली जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जशी वाचनाची आवड होती त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनाही वाचनाची आवड लागावी यासाठी शाळा करत असलेला हा उपक्रम इतरांनीदेखील राबविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर या उपक्रमाच्या निमित्ताने सातत्याने वाचन करण्यासाठी शपथ घेऊन संकल्प करण्यात आला. उपस्थितांना उपक्रमाचे स्वरूप आणि महत्व स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करत वंदन केले.
यावेळी या उपजक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वाचनासाठी विविध विषयांवरील तब्बल ३०० च्यावर पुस्तके उपलब्ध करून देण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या पुस्तकांचे वाचन केले, त्यासोबतच वाचलेल्या पुस्तकांचे टिपणही काढले. समारोप प्रसंगी यावेळी विद्यार्थ्यांनी आपले वाचनाचे अनुभव मोठ्या प्रमाणात उपस्थितांसमोर मांडले.कार्यक्रमाचे नियोजन माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष तथा शाळा विकास समितीचे अध्यक्ष अप्पा धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा निकिता कुर्टे, उपाध्यक्ष सागर घवाळी, सदस्य उदय रहाटे, बालरक्षक विश्वनाथ शिर्के, प्रिया तांबटकर, मनस्वी तांबटकर, अक्षरा शिर्के यांनी केले.
तर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावार, केंद्रप्रमुख एकनाथ महाकाळ यांचया सूचनेनुसार मुख्याध्यापक माधव अंकलगे आणि सहकारी शिक्षिका राधा नारायणकर यांनी प्रयत्न केले.
या उपक्रमाच्या शुभारंभ आणि समारोप प्रसंगी सत्कोंडी – पन्हळी – कांबळेलावगण ग्रामपंचायतचे सरपंच श्री. सतीश थुळ, सामाजिक कार्यकर्ते रजत पवार, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या युवाशक्तीचे दक्षिण कोकण प्रमुख अरुण मोर्ये, सामाजिक कार्यकर्ते अशोक सांबरे, सामाजिक कार्यकर्ते शिरीष लिंगायत, मारुती कुर्टे, पालक, ग्रामस्थ, आजी – माजी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
अगदी लहान शाळा असूनही शाळेच्या वतीने महामानावांना अभिवादन करण्याच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.







