GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी-दादर गाडी पूर्ववत सुरू करा, अन्यथा तीव्र आंदोलन; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा रेल्वे प्रशासनाला इशारा

Gramin Varta
239 Views

रत्नागिरी:कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून कोकणवासीयांची हक्काची मानली जाणारी रत्नागिरी-दादर पॅसेंजर रेल्वे प्रशासनाने दादरपर्यंत बंद केल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. ही गाडी पुन्हा एकदा दादर स्टेशनपर्यंत सुरू करावी, अशी आग्रही मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. मुंबई आणि उपनगरात, विशेषतः वसई-विरार, बोईसर, मीरा-भाईंदर, ठाणे आणि भांडुप यांसारख्या भागात कोकणवासीय मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. मध्यमवर्गीय जनतेसाठी अत्यंत सोयीची आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारी ही सेवा बंद झाल्यामुळे चाकरमान्यांचे आर्थिक नुकसान होत असून प्रवासातही मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत.

कोकणकरांच्या जीवनाशी निगडित असलेली ही रेल्वे सेवा पूर्वीप्रमाणेच दादरपर्यंत सुरू करावी, अशी विनंती रेल्वे प्रशासनाला करण्यात आली आहे. जर प्रशासनाने या मागणीची दखल घेतली नाही, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रेल्वे प्रशासनाला अधिकृत निवेदन देऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. याप्रसंगी शेखर घोसाळे, प्रशांत साळुंखे, युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत, उपशहरप्रमुख नितीन तळेकर, सलील डाफळे, उपतालुकाप्रमुख विजय देसाई, विभागप्रमुख मयुरेश्वर पाटील, राजाराम रहाटे, प्रशांत सुर्वे आणि साजिद पावसकर उपस्थित होते

Total Visitor Counter

3387335
Share This Article