GRAMIN SEARCH BANNER

फटाके वाजवणे म्हणजे पैसे जाळणे हे लक्षात घ्यावे – युयुत्सु आर्ते

Gramin Varta
85 Views

देवरुख: दिवाळी सण पर्यावरणपूरक साजरा करावा, फटाके वाजवणे म्हणजे पैसे जाळणे हे लक्षात घेऊन दिवाळीला फटाके न वाजवता वाचवलेल्या पैशातून पर्यटन करा,गरजूंना दान द्या, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांनी केले आहे.

फटाकेमुक्त दिवाळी अभियान राबवताना श्री. आर्ते यांनी आजपर्यंत हजारो शाळकरी मुलांचे प्रबोधन करून पर्यावरण रक्षणाचा वसा जोपासला आहे. दरवर्षी फटाकेमुक्त दिवाळीचे फायदे सांगणारे पत्रक काढून मुले, पालक, शिक्षकांमध्ये आर्ते जनजागृती करत आहेत,

दिवाळीच्या सुट्टीत फटाके खरेदी न करता जो विद्यार्थी जास्त पैसे साठवेल त्याला बक्षीस देण्याची प्रथा आर्ते यांनी सुरू ठेवली आहे. मुले कधी खोटे बोलत नाहीत, याचा यातून अनुभव आला आहे. शाळाशाळांमधून अनेक वर्षे ही जागृती मोहीम राबवण्यात यश आले आहे.

पर्यावरणाचा होणारा र्‍हास, फटाक्यांमुळे होणारे अपघात, लागणारे वणवे, फटाक्यांच्या कारखान्याला आग लागून होणारी मनुष्यहानी टाळण्यासाठी फटाक्यांवर बंदी आणावी, असे आवाहनही श्री. आर्ते यांनी केले आहे. श्री. आर्ते यांच्या आवाहनाला शाळकरी मुलांचा पाठिंबा मिळत असून फटाके वाजवण्याचे प्रमाण कमी झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

फटाके वाजवताना लहान मुलांचे अपघात होत आहेत याकडे पालकांनीही गांभिर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Total Visitor Counter

2656213
Share This Article