GRAMIN SEARCH BANNER

‘हजार रुपयांचे मत म्हणजे ५ वर्षांसाठी ५५ पैशांची मजुरी’; सुहास खंडागळेंचा ‘कॅश फॉर व्होट’वर घणाघात

Gramin Varta
128 Views

गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी सोशल मीडियावरून मतदारांना केले परखड आवाहन

देवरूख: सध्या रत्नागिरी जिल्ह्यात नगर परिषदा आणि देवरूख नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असतानाच, गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी ‘कॅश फॉर व्होट’ म्हणजेच पैसे घेऊन मतदान करण्याच्या प्रथेवर अत्यंत सडेतोड शब्दांत टीका केली आहे. “हजार रुपये घेऊन दिले जाते ते मत नसून, ५५ पैसे मजुरीने केलेली रोजंदारी आहे,” अशा शब्दात त्यांनी मतदारांना विकत घेण्याच्या प्रवृत्तीवर हल्लाबोल केला आहे.

सुहास खंडागळे यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या एका पोस्टद्वारे हा गंभीर मुद्दा मांडला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना विविध आमिषे दाखवली जातात, यात प्रामुख्याने पैसे वाटपाचा प्रकार घडतो. याच प्रथेवर बोट ठेवत खंडागळे यांनी एक नेमके गणित मांडले आहे.

काय आहे ‘५५ पैशांचे’ गणित?

आपल्या पोस्टमध्ये खंडागळे म्हणतात, “मत हे विचार करून द्यायचे असते.” त्यांनी पैसे घेऊन मतदान करणाऱ्यांना त्यांच्या कृतीची जाणीव करून देताना म्हटले आहे की, “निवडणुकीत एका मतासाठी मिळणारे हजार रुपये जर पाच वर्षांसाठी (१८२५ दिवस) विभागले, तर त्याची किंमत दिवसाला फक्त ५५ पैसे इतकी होते.”

या गणिताच्या आधारे त्यांनी एक उपरोधिक प्रश्नही उपस्थित केला आहे. “आता ज्यांना ५ वर्षे ५५ पैसे दिवसाला मजुरी हवी, त्यांना आम्ही थांबविणारे कोण?” असा सवाल करत त्यांनी अशा मतदारांना आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडले आहे.

‘स्वाभिमानी जनता विचारांना मत देईल
खंडागळे यांनी केवळ टीकाच केली नाही, तर मतदारांना भावनिक आवाहनही केले आहे. “स्वाभिमानी जनता मात्र विचारांना मत देईल,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मतदारांनी तात्पुरत्या आमिषाला बळी न पडता, आपल्या भागाचा विकास, येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य आणि स्वतःचा स्वाभिमान लक्षात घेऊन, विचारपूर्वक मतदान करावे, असे आवाहन गाव विकास समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Total Visitor Counter

3206617
Share This Article