संगमेश्वर पोलिसांनी मुलाला घेतले बोलावून
संगमेश्वर : तालुक्यातील गोळवली आमकरवाडी येथील दत्तमंदिर परिसरात मानवतेला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. ९० वर्षीय वृद्ध आईला मुलाने घरात एकटीच ठेवून मुंबईला पळ काढल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वृद्ध महिलेची अवस्था पाहून संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
रुक्मिणी विठोबा आमकर (वय अंदाजे ९०) या वृद्ध महिलेची हालअपेष्टा ऐकून ग्रामस्थांचे मन हेलावून गेले आहे. वृद्धत्व व आजारपणामुळे पूर्णपणे अंथरुणाला खिळलेल्या रुक्मिणी आमकर यांची जबाबदारी असलेल्या मुलगा महादेव विठोबा आमकर व सून यांनी त्यांच्याशी अत्यंत निर्दय वागणूक दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. जेवण, औषधोपचार, स्वच्छता यांसारख्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होत असून, शिवीगाळ व मानसिक छळ केला जात असल्याचे ग्रामस्थांनी ठामपणे नमूद केले आहे. बायकोसोबत हा मुलगा मुंबईला राहत आहे. मात्र जन्मदात्या आईला विसरल्याने संताप व्यक्त होत आहे.
या सगळ्यात अधिक धक्कादायक बाब म्हणजे रुक्मिणी आमकर यांना अशा असहाय अवस्थेत घरात एकट्याच सोडून मुलगा महादेव आमकर मुंबईला निघून गेल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, “या वृद्ध मातेच्या जीवाला काही धोका झाल्यास जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या अर्जात प्रौढ व ज्येष्ठ नागरिकांच्या देखभाल व कल्याण अधिनियम २००७ तसेच भारतीय दंडसंहितेच्या कलम १५१ अंतर्गत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. केवळ रुक्मिणी आमकर यांच्यासाठीच नव्हे, तर पंचक्रोशीतील इतर वयोवृद्ध पालकांसाठीही हा इशारा व दिशादर्शक ठरावा, अशी भावना तक्रारकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, संगमेश्वर पोलिस प्रशासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून रुक्मिणी आमकर यांना संरक्षण द्यावे व दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू होण्याची शक्यता असून, प्रशासनाची भूमिका काय असते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संगमेश्वर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चव्हाण यांनी त्वरित लक्ष घालून वृद्धेचा मुलाला मुंबईवरून बोलावून घेतले आहे. मंगळवारी मुलगा पोलिस ठाण्यात हजर होणार आहे.
संगमेश्वरात अंथरुणाला खिळलेल्या 90 वर्षीय वृद्ध आईला घरात सोडून मुलगा गेला मुंबईला; वृद्धेचे हाल पाहून ग्रामस्थ हळहळले, पोलिसांना निवेदन






