GRAMIN SEARCH BANNER

ब्रेकींग : चिपळूणमध्ये धुळ्यातील जोडप्याची नदीत उडी घेऊन आत्महत्या

चिपळूण | प्रतिनिधी
चिपळूण शहरात धक्कादायक घटना घडली असून, धुळे येथील एका जोडप्याने वाशिष्ठी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना गांधेश्वर मंदिराजवळ घडली असून, तरुणी पाण्यात बुडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी निलेश आहिरे (वय १९) व तिचा पती निलेश रामदास आहिरे (वय २६), सध्या चिपळूण तालुक्यातील पाग येथील रहिवासी असून, मूळ गाव धुळे जिल्ह्यात आहे. आज दुपारी दोघांनी रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या गंधारेश्वर ब्रिजवरून एकत्रितपणे वाशिष्ठी नदीत उडी मारली. प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक व वैयक्तिक कारणामुळे हे पाऊल उचलले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, या संदर्भात तपास सुरू असून निश्चित कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

घटनेची माहिती मिळताच चिपळूण शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच प्रांताधिकारी आकाश लिगाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन आढावा घेतला. तत्काळ एनडीआरएफ (राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक) यांना पाचारण करण्यात आले असून त्यांचे जवान दोघांचा मृतदेह शोधण्यासाठी नदीत कसोशीने शोध घेत आहेत.

या घटनेमुळे गंधारेश्वर परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी नियंत्रण मिळवत शोध कार्यासाठी नदीकाठ सील केला. सायंकाळी उशिरापर्यंत दोघांचा शोध सुरू होता, मात्र त्यांचा ठावठिकाणा लागलेला नव्हता.

दरम्यान, अश्विनी व निलेश यांचे काही दिवसांपूर्वीच लग्न झाले होते, अशी माहिती शेजाऱ्यांकडून समजते. दोघेही काही दिवसांपासून पाग येथे भाड्याने वास्तव्यास होते. आत्महत्येपूर्वी काही प्रकार झाला होता का, कोणी तरी जबाबदार आहे का, याचा पोलीस तपास करीत आहेत.

या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी एनडीआरएफचे पथक दाखल झाले असून, नदीत शोधमोहीम सुरू आहे. मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

चिपळूण पोलीस पुढील तपास करत असून, या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

Total Visitor Counter

2455606
Share This Article