GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वर तालुक्यात ‘ग्रामीण क्रिकेट समिती’ची स्थापना; खेळाडूंना मिळणार हक्काचे व्यासपीठ

संगमेश्वर (वार्ताहर):संगमेश्वर तालुक्यातील क्रिकेट स्पर्धांना अधिक शिस्तबद्ध, पारदर्शक आणि सर्वमान्य स्वरूप देण्यासाठी ‘ग्रामीण क्रिकेट समिती – संगमेश्वर तालुका’ची अधिकृत स्थापना करण्यात आली आहे. तालुक्यातील क्रिकेटला नवी दिशा देण्यासाठी २५ फेब्रुवारी २०२६ रोजी एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत तालुकयातील क्रिकेट क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यकारिणीची निवड बहुमताने करण्यात आली असून, यामुळे ग्रामीण भागातील क्रिकेटला आता नवी ऊर्जा मिळणार आहे.

या नवनिर्वाचित समितीच्या अध्यक्षपदी मारुती वाघमारे यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्ष म्हणून अमित जाधव, अभिराज नारकर आणि सूर्यकांत पांचाळ यांची नियुक्ती झाली आहे. सचिवपदाची जबाबदारी रणजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आली असून मयुरेश यादव, स्वप्निल माईन आणि अमित तळेकर यांची सहसचिव म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच खजिनदार म्हणून रोहित जाधव तर सदस्य म्हणून शशिकांत गोरुले, आदित्य केळस्कर, योगेश चव्हाण, अनिकेत शिंदे आणि रितेश पांचाळ यांचा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.

बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, तालुक्यातील संघ नोंदणी फी १ हजार रुपये निश्चित करण्यात आली असून विभागनिहाय जबाबदाऱ्यांचे वाटपही लवकरच केले जाणार आहे. विशेष म्हणजे नगरपंचायत क्षेत्रातील संघांना वॉर्डनिहाय स्पर्धेत सहभागी करून घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला. समितीचे सचिव रणजित पवार यांनी यावेळी सांगितले की, तालुक्यातील क्रिकेट अधिक संघटित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पुढे नेणे हा या समितीचा मुख्य उद्देश आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक खेळाडूला न्याय मिळावा, स्पर्धांमधील संभाव्य वाद टाळले जावेत आणि क्रिकेटला एक सकारात्मक दिशा मिळावी यासाठी ही समिती कटिबद्ध राहणार आहे. या निर्णयामुळे तालुक्यातील क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण असून भविष्यात मोठ्या स्पर्धांचे आयोजन सुलभ होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Total Visitor Counter

3486470
Share This Article