GRAMIN SEARCH BANNER

खेड: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार केल्याचा राग; पतीनेच घर पेटवून दिले

Gramin Varta
3 Views

खेड: तालुक्यातील कोतवली येथे एका संतापजनक घटनेत पतीने आपल्या राहत्या घराला आग लावून संपूर्ण संसार राखरांगोळी केल्याची घटना मंगळवार, १२ मे रोजी दुपारी घडली आहे. पतीचे बाहेर असलेल्या प्रेमसंबंधाची तक्रार पत्नीने पोलीस ठाण्यातील महिला कक्षात केल्याचा राग मनात धरून हे कृत्य करण्यात आले. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात पती सचिन सत्यवान जुवळे (रा. टेपे भोईवाडी, खेड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेले वृत्त असे की, फिर्यादी प्रियंका सचिन जुवळे (वय २६) यांनी पतीचे शुभ्रा दिवेकर नावाच्या महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून सासूसोबत खेड पोलीस ठाणे गाठले होते. तेथील महिला समुपदेशन केंद्राच्या विशाखा चव्हाण यांनी या तक्रारीची दखल घेत पती सचिन आणि संबंधित महिलेला चौकशीसाठी फोन करून बोलावले होते. याचा प्रचंड राग सचिन याला आला. प्रियंका या पोलीस ठाण्यात असतानाच सचिनने कोतवली येथील आपल्या घराचा पाठीमागील सिमेंटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घर नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याने कोणत्याही ज्वलनशील पदार्थाचा वापर करून घराला आग लावून दिली.

या भीषण आगीत घराच्या छपराचे लाकडी भाले जळून खाक झाल्याने सर्व कौले खाली कोसळली. तसेच घरातील कपडे, धान्य आणि इतर सर्व जीवनावश्यक वस्तू जळून भस्मसात झाल्या आहेत. भरदुपारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी प्रियंका जुवळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खेड पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३२६(जी) नुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक १३७/२०२६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या आगीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3380114
Share This Article