GRAMIN SEARCH BANNER

‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ मोहिमेअंतर्गत रत्नागिरी आरपीएफची कामगिरी; रेल्वेने एकटा प्रवास करणाऱ्या मुलाची सुटका

Gramin Varta
3 Views

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावरील गाडी क्रमांक १२२२३ मध्ये नियमित गस्त घालत असताना रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) पथकाने एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलाची सुटका केली आहे. ही कारवाई १३ मे रोजी रत्नागिरी आरपीएफच्या पथकाकडून करण्यात आली असून, संबंधित मुलाला सुरक्षितरीत्या चाईल्डलाईनच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी आरपीएफचे सहाय्यक उपनिरीक्षक आर. एस. चौहान आणि कॉन्स्टेबल आर. रवी कुमार हे रेल्वे गाडीमध्ये नियमित तपासणी करत असताना त्यांना एक १४ वर्षांचा मुलगा कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय एकटाच प्रवास करताना आढळला. पथकाने प्रेमाने चौकशी केली असता तो मुलगा घरून कोणालाही न सांगता निघाल्याचे समोर आले. रेल्वे सुरक्षा बलाच्या ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ मोहिमेअंतर्गत या मुलाला तत्काळ ताब्यात घेऊन त्याला सुरक्षित संरक्षण देण्यात आले.

रेल्वे पोलिसांनी या घटनेची रीतसर नोंद करून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर मुलाच्या भविष्यातील सुरक्षिततेच्या दृष्टीने त्याला रत्नागिरी येथील चाईल्डलाईन संस्थेच्या प्रतिनिधींच्या ताब्यात देण्यात आले आहे. रेल्वे सुरक्षा बलाच्या या सतर्कतेमुळे एका अल्पवयीन मुलाला चुकीच्या हातात पडण्यापासून वाचवण्यात यश आले असून, आरपीएफच्या ‘सदर सेवा’ या ब्रीदवाक्यानुसार राबवण्यात आलेल्या या मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Total Visitor Counter

3380361
Share This Article