सोलापुरातील मानवाधिकारी सुरक्षा संघाचे महेश थिटे यांची न्यायालयात तक्रार
रत्नागिरी : शहराच्या सुधारित नळपाणी योजनेविरोधात न्यायालयात खासगी तक्रार दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. सुमारे ५९ कोटी रुपयांच्या या योजनेचे कंत्राट मिळवण्यासाठी अन्वी कन्स्ट्रक्शन कंपनीने निविदा प्रक्रियेत पात्र ठरण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सादर कागदपत्रांतील तथ्यांची सखोल तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
सोलापूर येथील मानवाधिकारी सुरक्षा संघाचे जनरल सेक्रेटरी महेश थिटे यांनी ही तक्रार रत्नागिरी येथील मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालयात दाखल केली आहे. निविदेत नमूद असलेली किमान ५० टक्के कामाचा अनुभव ही अट पूर्ण करण्यासाठी कंपनीने बनावट प्रमाणपत्रे सादर केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. याबाबत यापूर्वी पोलिस विभाग व जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही दखल न घेतल्याने न्यायालयात दाद मागण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीनुसार, अन्वी कन्स्ट्रक्शन कंपनीने कोल्हापूर व सांगली येथील जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून तसेच हुपरी येथील कामाच्या नावावर बेकायदेशीर प्रमाणपत्रे मिळवली असल्याचा आरोप आहे. तसेच कंपनीची मूळ नोंदणी वर्ग ४ मध्ये असताना, रत्नागिरी शहराच्या नळपाणी योजनेची निविदा भरण्याच्या अवघ्या ३१ दिवस आधी बोगस कागदपत्रांच्या आधारे वर्ग १ चे नोंदणी प्रमाणपत्र मिळवण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या नोंदणीसह अन्य कागदपत्रांची योग्य शहानिशा न करता संबंधित अधिकाऱ्यांनी सहाय्य केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या सर्व बाबींची दखल घेत न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार निविदा प्रक्रियेसाठी सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी करून एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ही तक्रार खासगी स्वरूपाची असून रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक केदार वायचळ यांच्याकडून सध्या कागदपत्रांतील तथ्यांची तपासणी सुरू आहे







