राजापूरच्या विकासासाठी पर्यावरणपूरक प्रकल्प आणा; देवाचे गोठणे ग्रामस्थांचे आमदार किरण सामंत यांना साकडे

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

राजापूर:  तालुक्यातील देवाचे गोठणे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सुशिक्षित युवकांच्या हाताला हक्काचा रोजगार मिळवून देण्यासाठी गावात पर्यावरणपूरक प्रकल्प राबवण्यात यावेत, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामस्थांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत यासंदर्भात एकमुखी ठराव मंजूर करण्यात आला असून, विकासाच्या या प्रक्रियेत आमदार किरण सामंत यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

या बैठकीत बोलताना ग्रामस्थांनी ग्रामीण भागातील बेरोजगारीच्या भीषण समस्येकडे लक्ष वेधले. उच्च शिक्षण घेऊनही रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने स्थानिक तरुण हतबल झाले आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी गावातच रोजगारनिर्मिती होईल अशा निसर्गाचा समतोल राखणाऱ्या प्रकल्पांची गरज आहे. यामध्ये शेतीपूरक व्यवसाय, सेंद्रिय शेती, कृषी पर्यटन, सौर ऊर्जा आणि लघुउद्योगांना चालना दिल्यास स्थानिकांना गाव सोडून शहराकडे धाव घ्यावी लागणार नाही, असा सूर या बैठकीत उमटला. या सर्व प्रस्तावांवर सविस्तर चर्चा करून पुढील पाठपुराव्यासाठी एक समितीही स्थापन करण्यात आली आहे.

आमदार किरण सामंत यांनी शासन स्तरावर या मागणीचा गांभीर्याने विचार करून आवश्यक निधी आणि मान्यता मिळवून द्यावी, असे साकडे ग्रामस्थांनी यावेळी घातले. “गावाच्या उज्वल भविष्यासाठी आणि तरुणांच्या हाताला काम मिळण्यासाठी आम्ही सर्व राजकीय मतभेद विसरून एकत्र आलो आहोत. आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली देवाचे गोठणे गावात सकारात्मक बदल घडेल, असा आम्हाला ठाम विश्वास आहे,” अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. या एकमुखी ठरावामुळे तालुक्यात विकासाची नवी दिशा निश्चित होण्याची शक्यता वर्तवली जात असून, ग्रामस्थांच्या या एकजुटीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *