GRAMIN SEARCH BANNER

देवरूख: पर्शरामवाडी येथे जंगलमय भागात हातभट्टीवर धाड; १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Gramin Varta
239 Views

देवरूख: देवरूख येथील पर्शरामवाडी, चाफयाचा पऱ्हा या जंगलमय भागात गावठी हातभट्टीची दारू गाळणाऱ्या एका ६० वर्षीय आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रंगेहात पकडले. पोलिसांनी या कारवाईत दारू निर्मितीसाठी लागणारे रसायन, दारू आणि उपकरणे असा तब्बल १ लाख २० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, आरोपीविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई १५ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी २.२५ वाजता संगमेश्वर तालुक्यातील देवरूख, पर्शरामवाडी येथील जंगलमय भागात करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार सत्यजित शिवाजी दरेकर यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. पर्शरामवाडी, देवरूख येथील रहिवासी नारायण रावजी पर्शराम (वय ६०) हा आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गैरकायदा गावठी दारू बनवण्याचे साहित्य जवळ बाळगून हातभट्टी चालवत असताना आढळून आला.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असता, तेथे गावठी दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे मोठे साहित्य आढळून आले. जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये २०० लिटर मापाचे अर्धवट जळालेले एक लोखंडी बॅरल (किंमत रु. ७,७००/-) होते, ज्यामध्ये सुमारे १५० लिटर गरम गूळ-नवसागर मिश्रित कुजलेले रसायन होते. तसेच, दारू गाळण्यासाठी वापरला जाणारा लाकडी चाटू आणि प्लास्टिकचा पाईपही जप्त करण्यात आला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पोलिसांनी २५ लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू (किंमत रु. २,७००/-) कॅनसह जप्त केली. याशिवाय, दारू बनवण्यासाठी तयार ठेवलेले गुळ, नवसागर मिश्रित कुजके रसायन मोठ्या प्रमाणात आढळून आले. २०० लिटर मापाचे एकूण आठ प्लास्टिकचे बॅरल (१६०० लिटर रसायन, किंमत रु. ८०,०००/-), ५०० लिटर मापाचे एक प्लास्टिकचे बॅरल (किंमत रु. २५,०००/-) आणि १०० लिटर मापाचे एक प्लास्टिकचे बॅरल (किंमत रु. ५,०००/-) असे एकूण २२०० लिटर रसायन पोलिसांनी नष्ट केले.
या घटनेची नोंद देवरूख पोलीस ठाण्यात गु.आर.नं. १३१/२०२५ अंतर्गत महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ब), (क), (ड), (फ), (ई) प्रमाणे करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3072963
Share This Article