चिपळूण: कोकण रेल्वे मार्गावरील चिपळूण रेल्वे स्थानकावर मोबाईल चोरीच्या तक्रारीची तातडीने दखल घेत रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) एका चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई १२ मे रोजी करण्यात आली असून, पोलिसांनी आरोपीकडून १४ हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि सिमकार्ड हस्तगत केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूण रेल्वे स्थानकावर एका प्रवाशाचा मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार आरपीएफकडे प्राप्त झाली होती. या घटनेचे गांभीर्य ओळखून आरपीएफच्या पथकाने स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. या तपासणी दरम्यान प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर चार्जिंगला लावलेला मोबाईल चोरताना एक संशयित व्यक्ती कॅमेऱ्यात कैद झाली. सीसीटीव्हीमधील वर्णनावरून रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने स्थानक परिसरात शोध मोहीम राबवली.
सहाय्यक उपनिरीक्षक दिगंबर सिंग आणि हवालदार सचिन गावडे यांनी तांत्रिक माहिती आणि वर्णनाच्या आधारे संशयित आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे चोरीचा मोबाईल मिळून आला. पोलिसांनी सुमारे १४ हजार रुपये किमतीचा हा मोबाईल आणि त्यातील सिमकार्ड जप्त केले असून, आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या कामगिरीमुळे रेल्वे प्रवाशांकडून आरपीएफच्या सतर्कतेचे कौतुक होत आहे.





