रत्नागिरी : लहानपणी शाळेत असताना साने गुरुजींच्या सहवासामुळे माझ्यात साहित्याची बीजे रोवली गेली, असे पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि कोमसाप यांच्या संयुक्त विद्यमाने श्री.कर्णिक यांचा नागरी सत्कार शनिवारी र्तनागिरीत करण्यात आला. त्यानिमित्ताने कर्णिक यांची प्रकट मुलाखत अभिजित हेगशेट्ये, कोमसापच्या केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, कवी अशोक बागवे आणि कवी-गीतकार अरुण म्हात्रे यांनी घेतली. त्यातील विविध प्रश्नांना उत्तरे देताना कर्णिक बोलत होते.
ते म्हणाले, माझे बालपण कोणीही मोठा मार्गदर्शक माझ्या कोकणातील खेड्यापाड्यात गेले. मात्र लहानपणी साने गुरुजींनी माझ्या शाळेला दिलेली भेट माझ्यात बदल घडविणारी ठरली. आयुष्यातील पहिला लेखक मी पाहिला होता. त्यांनी सांगितलेल्या आईच्या गोष्टीमध्ये मला माझी आई दिसत होती. याच त्यांच्या सहवासाने माझ्यामध्ये साहित्याची बीजे रोवली गेली.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला तेव्हा केवळ दोन मते कोकणात असल्याचे समोर आले. त्यामुळे अनेकांनी तुम्हाला कोण निवडून देणार. असा प्रश्न उपस्थित कैला त्यावेळी कुसुमाग्रज यांनी पहिला आशीर्वाद दिला. यानंतर पु. ल. देशपांडे यांनी समर्थन असल्याचे जाहीर केले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी आशीर्वाद दिले. यामुळे विजय सुकर झाला. कोकणात केवळ दोन मते असताना माझा विजय होणे हा चमत्कारच होता. कोकणात थोर विचारवंत, लेखक, पत्रकार होऊन गेले. साहित्याचा मोठा वारसा कोकणाला लाभला आहे. मात्र मी निवडणूक लढलो, तेव्हा केवळ दोन मते कोकणात असल्याची खंत मनामध्ये होती. यामुळेच पश्चिम महाराष्ट्रातल्या लेखकांसाठी असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेसारखी संघटना असावी असा विचार मनामध्ये आला. त्यातूनच कोकण मराठी साहित्य परिषदेची स्थापना झाली, असे त्यांनी सांगितले.
कवी केशवसुत यांच्या कविता शालेय अभ्यासक्रमात असल्याने गणपतीपुळे येथे आलो तेव्हा मालगुंड येथील कवी केशवसुत यांच्या घराला भेट दिली. अतिशय दुरवस्थेत असलेले घर पाहून मन हेलावून गेले. त्यानंतर मी लंडन येथे गेलो असता त्याठिकाणी शेक्सपिअरचे घर पाहिले. सुमारे ४०० वर्षांपूर्वीचे त्याचे घर इंग्रजांनी जनत करून ठेवले आहे. त्यांच्या वस्तूदेखील त्याठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या. हे सर्व पाहून मी भारावून गेलो. यातून कवी केशवसुत यांचे घर असलेले ठिकाण स्मारक स्मारक करावे, अशी प्रेरणा मिळाली. राज्यातील काही लेखकांची टीम घेऊन रत्नागिरीत आलो त्यांना केशवसुत यांचे घर दाखविले. यातून काही पैसे गोळा करून स्मारकाचे भूमिपूजन केले. आज उभे राहिलेले स्मारक हे लोकांच्या पुढाकारातून झाले असल्याचे कर्णिक यांनी सांगितले.
माजी खासदार बॅ. नाथ पै यांच्या स्वभावात एक विलक्षण गोडवा होता. समाजवादी विचारांशी अतिशय ठाम असे ते व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा मला सहवास लाभला हे माझे भाग्यच होते. मालवणात १९६२ साली झालेल्या वादळावेळी मालवणात जात असताना आम्हाला भूक लागल्याने आम्ही कट्टा येथे वाटेत थांबलो. नाथ पै एका घरामध्ये गेले असता घरातील वृद्ध महिलेने आम्हाला पेज बनवून दिली. आम्ही सर्वांनी ती आवडीने घेतली. लोकांचे अशा प्रकारे प्रेम मिळवणारा त्यांच्यासारखा नेता पाहिला नाही. लोकांविषयी आस्था, कणव असणे ही मला नाथ पै यांच्याकडून मिळालेली देणगी आहे, असे मधुभाईंनी सांगितले.
आयुष्याकडे तटस्थपणे पाहणे गरजेचे सांगून ते म्हणाले, प्रत्येकाने आपल्या आयुष्याकडे तटस्थपणे पाहणे गरजेचे आहे. आपण जे काही मिळवले त्यात मी अतिशय समाधानी आहे. व्यक्तिगत जीवनात मला अपयश आले नाही. सार्वजनिक जीवनात काही ठिकाणी अपयश आले. मात्र या अपयशातूनच मी यशाकडे गेलोय अनेक मुलाना पदवीधर करण्याचे भाग्य मला मिळाले. त्यामुळे आयुष्यामध्ये मी समाधानी असल्याचे कर्णिक यांनी यावेळी सांगितले.
कर्णिक यांनी रत्नागिरी शहराशी असलेल्या आठवणींना यावेळी उजाळा दिला. १९५१ मध्ये आपण रत्नागिरीत शिक्षणासाठी आलो होतो. त्यावेळी रत्नागिरी-सिंधुदुर्ग एकच जिल्हा होता. शिक्षणाच्या फार सोयी नव्हत्या. याच रत्नागिरीमधून आपण मॅट्रिक झालो. दीनानाथ वाघदरे यांनी पहिली कथा प्रसिद्ध केली होती. ही प्रसिद्ध झालेली कथा मी आईला दाखविली. त्यावेळी तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते. ‘बाळा तू खूप मोठा लेखक हो असा आशीर्वाद आईने दिला. रत्नागिरीतच झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मला मिळाले. त्यामुळे रत्नागिरी शहराशी माझे ऋणानुबंध खूप जुने आहेत. या आठवणी आजही माझ्यासमोर येतात. समारंभाला संपूर्ण कोकणातून मधुभाईप्रेमी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
साने गुरुजींच्या सहवासामुळे साहित्याची बीजे रोवली गेली – मधु मंगेश कर्णिक






