लांजा : तालुक्यातील केळंबे येथील सुधा विष्णू नगर परिसरात रविवारी सकाळी जखमी अवस्थेत आढळलेल्या बिबट्याला वनविभागाच्या पथकाने शर्थीच्या प्रयत्नांनंतर सुरक्षितरीत्या पिंजऱ्यात पकडले. बिबट्याच्या पाठीच्या भागाला गंभीर दुखापत झाल्याने तो हालचालही करू शकत नव्हता. प्राथमिक उपचारानंतर पुढील वैद्यकीय उपचारांसाठी त्याला पुण्याकडे पाठविण्यात आले.
रविवारी सकाळी स्थानिक ग्रामस्थांना रस्त्यापासून सुमारे दोनशे फुटांवर जाळीत अडकलेला बिबट्या जखमी अवस्थेत दिसला. ग्रामस्थांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली. वनपाल सारीक फकीर आणि त्यांच्या पथकाने त्वरित घटनास्थळी धाव घेत दोन तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला सुरक्षितरीत्या जेरबंद करण्यात यश मिळवले.
वनपाल सारीक फकीर यांनी सांगितले की, “बिबट्याला कदाचित रात्री एखाद्या वाहनाची धडक बसल्याने त्याच्या मागच्या पायाला गंभीर दुखापत झाली असावी. सध्या त्याला प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी पुण्याकडे रवाना करण्यात आले आहे.”
अलीकडे लांजा परिसरात बिबटे भक्ष्याच्या शोधात नागरी वस्त्यांच्या दिशेने येताना वारंवार दिसत आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहनांच्या धडकेत जखमी होणाऱ्या बिबट्यांची संख्या वाढताना दिसते. वनविभागाने नागरिकांना रात्री वाहन चालवताना विशेष काळजी घेण्याचे आणि जंगली प्राणी आढळल्यास तत्काळ विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
लांजा : पायाला गंभीर दुखापत झालेला बिबट्या वनविभागाकडून जेरबंद






